स्पर्धा परीक्षेत वारंवार अपयश; नैराश्यातून तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल
By अविनाश साबापुरे | Updated: October 2, 2023 15:48 IST2023-10-02T15:46:50+5:302023-10-02T15:48:24+5:30
सुस्वभावी धनश्रीच्या अचानक मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त

स्पर्धा परीक्षेत वारंवार अपयश; नैराश्यातून तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल
पुसद (यवतमाळ) : पदवीपर्यंतचे शिक्षण घेऊन सध्या स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असलेल्या एका युवतीने गळफास घेत आत्महत्या केली. ही हृदयद्रावक घटना येथील श्रीरामपूर परिसरातील बावणे लेआउटमध्ये सोमवारी उघडकीस आली.
धनश्री मधुकर राठोड (२३) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धनश्री राठोड ही तरुणी पदवीधर असून सध्या ती स्पर्धा परीक्षेची तयारी करीत होती. तीने अनेक परीक्षा दिल्या. मात्र स्पर्धा परीक्षेत यश न आल्याने नैराश्यातून धनश्रीने शुक्रवारी रात्री १० वाजताच्या सुमारास राहत्या घरी पंख्याला साडीने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली.
हा प्रकार आई-वडिलांच्या लक्षात येताच त्यांनी धनश्रीला येथील खासगी दवाखान्यात उपचारार्थ दाखल केले. मात्र तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पुसद उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणी वसंतनगर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. धनश्रीच्या पश्चात पोफाळी पोलीस ठाण्यात जमादार असलेले वडील मधुकर राठोड, आई उषाबाई, भाऊ परिमल, विवाहित बहीण वनश्री, जावई असा बराच मोठा आप्त परिवार आहे. होतकरू व सुस्वभावी धनश्रीच्या अचानक मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार प्रवीण नाचणकर यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुदाम आडे करीत आहेत.