लाऊडस्पीकर वाजविण्यावरून दोन गटांत तुफान हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 15:42 IST2021-09-22T15:27:52+5:302021-09-22T15:42:36+5:30
विसर्जन मिरवणूक दरम्यान लाऊडस्पीकर वाजवू दिला नाही, म्हणून दोन गट आपसात भिडले. या भांडणात अनेकजण जखमी झाले असून या प्रकरणी पोलिसांनी ४६ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले.

लाऊडस्पीकर वाजविण्यावरून दोन गटांत तुफान हाणामारी
यवतमाळ : लाडक्या बाप्पांच स्वागत जस धूमधडाक्यात केलं जातं निरोपही तितकाच सुंदर आणि आनंदाने दिला जातो. सर्वत्र ढोल-ताशांचा आवाज, गुलाल फुलांची उधळण आणि बाप्पा मोरयाचा गजर ऐकू येतो. मात्र, कधी-कधी उत्सहाच्या भरात नको ते होऊन बसतं. फुलसावंगी येथे गणपती विसर्जन मिरवणूक दरम्यान लाऊडस्पीकर वाजवू दिला नाही, या कारणातून दोन गटांत हाणामारी झाली. यात अनेकजण जखमी झाले असून या प्रकरणी पोलिसांनी ४६ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले.
येथील भीकू नाईक तांडा परिसरात मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली. विसर्जन मिरवणूक सुरू असताना दिनेश उल्हास राठोड (२५) याने लाऊडस्पीकर लावण्याची मागणी केली. या कारणातून वाद वाढला. प्रकरण मारामारीवर पोहोचले. दिनेश राठोड यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गोपाल ताराचंद राठोड व अन्य १४ जणांवर गुन्हे दाखल केले. तर दुसऱ्या गटाकडून विश्वनाथ पांडुरंग आडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लक्ष्मण नामदेव आडे व अन्य ३० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले.
दोन्ही गटांकडून परस्पर विरोधी दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी भादंवि ३२४, ३२३, १४३, १४७, १४९, १८८, ५०४, ५०६ यासह मुंबई पोलीस कायद्याच्या कलम १३५ नुसार गुन्हे नोंदविले. अधिक तपास ठाणेदार विलास चव्हाण, जमादार निलेश पेंढारकर करीत आहे.