राळेगाव व कळंब येथे कडकडीत बंद
By Admin | Updated: April 19, 2015 02:07 IST2015-04-19T02:07:35+5:302015-04-19T02:07:35+5:30
धार्मिक भावना दुखावल्यावरून राळेगाव येथे शुक्रवारी रात्री तणाव निर्माण झाला होता.

राळेगाव व कळंब येथे कडकडीत बंद
राळेगाव : धार्मिक भावना दुखावल्यावरून राळेगाव येथे शुक्रवारी रात्री तणाव निर्माण झाला होता. या घटनेच्या निषेधार्थ राळेगाव आणि कळंब येथे शनिवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. राळेगाव शहरात काही ठिकाणी टायरही जाळण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी दोन तरुणांना अटक केली आहे.
राळेगाव येथील एका तरुणाच्या मोबाईलवर धार्मिक भावना दुखविणारा मजकूर आला. त्यामुळे रात्री तणाव निर्माण होवून शेकडो नागरिक राळेगाव पोलीस ठाण्यावर धडकले होते. जमावाच्या प्रक्षुब्ध भावना पाहून पोलिसांनी रात्रीच आरोपी शहारूख पठाण याला ताब्यात घेतले. तसेच त्याला मॅसेज पाठविणाऱ्या मारेगाव येथील आसिफ शेख याच्यावर धार्मिक भावना दुखविल्याचा गुन्हा दाखल केला. दरम्यान शनिवारी सकाळपासूनच शहरात तणावाचे वातावरण दिसत होते. तरुणांनी घोषणा देत शहरातील बाजारपेठ बंद केली. मुख्य चौकात टायर जाळून निषेध करण्यात आला. सकाळी बससेवाही ठप्प झाली होती. यवतमाळ, वर्धा आणि वणी मार्ग तब्बल तीन तास बंद होता. दरम्यान शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन ठाणेदार पंजाबराव डोंगरदिवे यांनी केले.
धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार शिवसेना तालुका प्रमुख विनोद काकडे, शहर प्रमुख राकेश राऊळकर यांनी दिली. शहरात दिवसभर पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. दरम्यान कळंब येथेही या घटनेच्या निषेधार्थ बंद पाळून पोलीस आणि तसहीलदारांना निवेदन दिले. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. (प्रतिनिधी)\