खुनानंतर भांबराजात रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2022 05:00 IST2022-02-05T05:00:00+5:302022-02-05T05:00:18+5:30

बाजार समितीचे संचालक शिवसैनिक सुनील डिवरे यांचे समर्थक रस्त्यावर उतरून संताप व्यक्त करू लागले. डिवरे यांच्या हत्येत सहभागी असलेल्या इतर तीन आरोपींना अटक केल्याशिवाय मृतदेह स्वीकारणार नाही, अशी भूमिका त्यांच्या समर्थकांनी घेतली. गुरुवारी रात्रीपासून भांबराजा येथे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला. राखीव पोलीस दलालाही गावात पाचारण करण्यात आले आहे. गुरुवारी रात्रीपासूनच गावामध्ये तणाव होता.

Stop the road to Bhambraj after the murder | खुनानंतर भांबराजात रास्ता रोको

खुनानंतर भांबराजात रास्ता रोको

लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरूळ / हिवरी : भांबराजा येथील सरपंच महिलेचे पती सुनील डिवरे यांची मारेकऱ्यांनी गोळ्या घालून हत्या केली. या घटनेचे तीव्र पडसाद शुक्रवारी सकाळीही कायम होते. संतप्त ग्रामस्थांनी पाेलीस प्रशासनाचा निषेध नोंदवित रास्ता रोको आंदोलन सुरू केले. नागपूर-बोरी-तुळजापूर हा महामार्ग ग्रामस्थांनी अडवून धरला. रस्त्यावर टायर जाळण्यात आले. तणावाची स्थिती दुपारपर्यंत कायम होती. 
बाजार समितीचे संचालक शिवसैनिक सुनील डिवरे यांचे समर्थक रस्त्यावर उतरून संताप व्यक्त करू लागले. डिवरे यांच्या हत्येत सहभागी असलेल्या इतर तीन आरोपींना अटक केल्याशिवाय मृतदेह स्वीकारणार नाही, अशी भूमिका त्यांच्या समर्थकांनी घेतली. गुरुवारी रात्रीपासून भांबराजा येथे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला. राखीव पोलीस दलालाही गावात पाचारण करण्यात आले आहे. गुरुवारी रात्रीपासूनच गावामध्ये तणाव होता. सुरुवातीला पोलिसांना ग्रामस्थांच्या रोषाला बळी पडावे लागले. गावच्या राजकारणातील वादातूनच सुनील डिवरे यांची हत्या झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. डिवरे यांच्या पत्नीने ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली. रात्री चार आरोपींना पोलिसांनी अटक केली, तर उर्वरित तीनजण पसार झाले. त्यांनाही तत्काळ अटक केली जावी, अशी मागणी ग्रामस्थांनी लावून धरली. डिवरे यांचा मृतदेह सायंकाळपर्यंत गावात पोहोचला नव्हता. दुपारी डिवरे समर्थकांनी राष्ट्रीय महामार्ग रोखून धरल्यामुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. 

गावात तणावपूर्ण शांतता 
- पोलीस ग्रामस्थांची समजूत घालण्याचा प्रयत्न करीत होते. दरम्यान, माजी मंत्री संजय राठोड यांनी घटनास्थळाला भेट दिली. डिवरे कुटुंबाचीही भेट घेऊन सांत्वन केले. आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर सायंकाळी आंदोलनाची धार कमी झाल्यानंतर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. गावात तणावपूर्ण शांतता होती. सुनील डिवरे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणी करून गावात आणण्यात आला. रात्री ८ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

 

Web Title: Stop the road to Bhambraj after the murder