अद्यापही कोसो दूर
By Admin | Updated: December 3, 2015 02:58 IST2015-12-03T02:58:51+5:302015-12-03T02:58:51+5:30
महाराष्ट्राच्या स्थापनेपासून आजपर्यंत सतत सत्ता भोगणाऱ्या काही बोटांवर मोजण्याइतक्या गावांचा उल्लेख होतो.

अद्यापही कोसो दूर
पुसद मतदारसंघ विकासापासून
अखिलेश अग्रवाल पुसद
महाराष्ट्राच्या स्थापनेपासून आजपर्यंत सतत सत्ता भोगणाऱ्या काही बोटांवर मोजण्याइतक्या गावांचा उल्लेख होतो. त्यातलेच पुसद हे एक गाव. मात्र ‘त्या’ बाकीच्या गाव-शहरांइतकी सुधारणा, विकास पुसद मतदारसंघाचा झाला नाही, हीच खंत.
पुसदला १९५२ पासून सत्तेचे वैभव आहे. त्यातही हा भाग वनसंपत्ती, शेती आणि पाण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. व्यवसाय, उद्योगधंदे, शेती या दृष्टीने मोठी बाजारपेठ आहे.एवढे असूनही सत्ताधाऱ्यांच्या दूरदृष्टीचा अभाव, नियोजनाची कमतरता यामुळे इथे दळणवळणासाठी साधी रेल्वेसुद्धा सुरू करता आली नाही. जेव्हा की ब्रिटिश सत्ता संपल्यावरही रेल्वेचे सर्व इन्फ्रास्टक्चर तयार होते. दोन वेळा राज्याचे मुख्यमंत्रीपद पुसदच्या नेतृत्वाकडे व २०१४ पर्यंत सत्तेत सहभागी राहूनही पुसद जिल्हा तसेच वर्धा-नांदेड रेल्वेचा प्रश्न कधी मांडलाच गेला नाही.
पुसद तालुक्यात नागरी सुविधांच्या बाबतीत थोडाफार सुधारणा असल्यातरी अद्यापही विकासोन्मुख अवस्थेतच आहे. वाड्या, तांडे, आदींसोबत दुर्गम आणि जंगली भागातील खेडी अशा स्वरुपाची रचना तालुक्याची आहे. तालुक्यात ११९ ग्रामपंचायती असून एकूण १८७ गावे आहेत. त्यात १० गावे उजाड आहेत. तालुक्यात वाड्या आणि दुर्गम खेड्यांचे प्रमाण अधिक आहे.‘गाव तेथे रस्ता आणि रस्ता तेथे एसटी’ ही शासनाची घोषणा असली तरी आजही या तालुक्यात अशी बरीचशी खेडी आहेत, की जेथे अद्यापही परिवहन महामंडळाची बस पोहोचलेली नाही. तसेच ब्रिटिश साम्राज्यवादाचा अस्त होऊन देशात स्वातंत्र्याचा सूर्य उजाडला त्याला आता ६८ वर्षे पूर्ण झालीत. या काळात देशाने मोठी प्रगती केली. मात्र या प्रगतीच्या नकाशावर पुसद तालुक्यातील जंगलाने वेढलेल्या गौळ (मांजरी) या गावाचे नाव कुठेच नाही. स्वातंत्र्याच्या ६८ वर्षानंतरही या गावात साधा रस्ता नाही व वीजही नाही. त्यामुळे हे गाव अजूनही अंधाराच्या पखाली वाहत आहे.
एकेकाळी रोजगाराने गजबजलेलं हे शहर सद्यस्थितीत पूर्णत: बकाल झाले आहे. रोजगाराचे स्त्रोत आटले आहेत. कापड गिरणी, सुधाकर नाईक साखर कारखाना, जिनिंग, दूध डेअरी, व्यवसाय, सहकार तत्वावर चालणाऱ्या दूध संस्था अशा भक्कम पायाभरणीने उद्योग विस्तारला होता. काहींच्या आता फक्त स्मृतीच उरल्या आहेत. आज हजारो हाताना काम आणि पोटाला भाकर देणारा हा उद्योग पूर्णत: मोडकळीस आला आहे. गेल्या २८ वर्षांत पुसद तालुक्यातील एकही मोठा उद्योग उभा राहिला नाही. उलट जुन्या संस्थांपैकी काही बंद पडल्या तर काही मरणासन्न अवस्थेत आहे. हाताला काम नसल्यामुळे दरवर्षी पुसद मतदारसंघातून ५० हजारांच्या वर मजूर महानगरांकडे कामाच्या शोधात जातात. वाशीम, नांदेड, हिंगोली या तीन जिल्ह्यांच्या सीमारेषांना स्पर्श करणारा पुसद तालुका नैसर्गिक संपदेने विपुल असतानाही उद्योगधंद्यांच्या बाबतीत कायम उपेक्षित राहिला आहे. शहराच्या विकासासाठी नांदी ठरणाऱ्या औद्योगिक वसाहतींचे प्रश्न अद्यापही प्रलंबित आहेत. शासन तरुणांना उद्योजक होण्याचे आवाहन करते. पण पुसद येथे उद्योगधंद्यासाठी आवश्यक मूलभूत सुविधांची पूर्तता नसल्याने औद्योगिक वसाहतीतील २० टक्के भूखंड अद्यापही ओसाड पडले आहे. फक्त बोटावर मोजण्याइतपत लघू-मध्यम स्वरुपाचे उद्योगधंदे येथे घरघरत असल्याने तालुक्याच्या औद्योगिक विकासाचे स्वप्न भंगले आहे.
हरितक्रांतीची आणि जलसंधारणाची राज्याला प्रेरणा देणाऱ्या तालुक्यातच या विचारांचा पूर्णपणे विसर पडला आहे. शेतकरी कारखानदार झाला पाहिजे हे कै. वसंतराव नाईक यांचे ब्रिद असतानाही त्यांच्या कर्मभूमीतील शेतकरी ऊसतोडीसाठी व इतर कामांसाठी पश्चिम महाराष्ट्रात जात आहेत. गेल्या ४२ वर्षांपासून परिसरातील धरणातील पुनर्वसनाबाबत हाल सुरू आहेत. इतर पुनर्वसित गावांकडे पाहता ती नंदनवने दिसत आहेत. त्या दृष्टीने प्रयत्न होत नाहीत. सूतगिरण्या, साखर कारखाने एकेक करत बंद पडत आहेत. वास्तविक सुपीक जमीन, कापसाचे मुख्य पीक, असताना रेडिमेड कपड्यांच्या कारखान्यांचे नियोजन करता आले असते. भरपूर पाणी असूनही दूरदृष्टीचा अभाव असल्याने आज पाणी पेटलेले आहे. उन्हातान्हात माळपठारासह तालुक्यात पाण्यासाठी हाल होत आहे. दोन क्षण मन रमविण्यासाठी बगीचा, उद्यान तर नाहीच. पण एखादा टाऊन हॉल, भाजी मंडई, फळमार्केट होणे गरजेचे आहे. कोणत्याही भागाचा विकास म्हणजे नेमके काय, याचा पुसद मतदारसंघात कुठेही विचार होताना दिसत नाही.