एसपींची जुगारावर धाड

By Admin | Updated: July 16, 2015 02:25 IST2015-07-16T02:25:03+5:302015-07-16T02:25:03+5:30

जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी बुधवारी स्वत: दुपारी पांढरकवडा रोड स्थित शारदा चौकातील जुगारावर धाड घातली.

SPA's gambling racket | एसपींची जुगारावर धाड

एसपींची जुगारावर धाड

शारदा चौक : तिघांना अटक, मालकासह तिघे पसार
यवतमाळ : जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी बुधवारी स्वत: दुपारी पांढरकवडा रोड स्थित शारदा चौकातील जुगारावर धाड घातली. एसपींच्या या आक्रमक पावित्र्याने अवैध व्यावसायिक व त्यांंना छुपे संरक्षण देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे. एसपींची ही धाड ‘लोकमत’च्या वृत्ताचा परिणाम मानला जात आहे.
शारदा चौकात गुड्डू ठाकूर याचा अनेक वर्षांपासून जुगार अड्डा चालविला जातो. बुधवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास अखिलेशकुमार सिंह यांनी आपल्या काही निवडक कर्मचाऱ्यांसह थेट या जुगारावर धाड घातली. या धाडीत अलिम जाफर भाटे रा. तायडेनगर, विजय विठ्ठल गायकवाड, प्रेमसिंग मोतीसिंग ठाकूर या तिघांना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून जुगार साहित्य व चार ते पाच हजाराची रोख जप्त करण्यात आली. या जुगाराचे मालक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बबलू ठाकूर, सोनू भरोले व लखन बडोले या तिघांनासुद्धा आरोपी बनविण्यात आले आहे. या धाडीत एसपींनी स्वत: हा अड्डा उद्ध्वस्त केला. तेथील शेड तोडून टाकण्यात आले. खुद्द एसपींनी धाड घातल्याचे कळताच वडगाव रोड पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी पोहोचले. यावेळी सिंह यांनी जुगार व्यावसायिक, परिसरातील नागरिक व संबंधित पोलीस यंत्रणेची चांगलीच झाडाझडती घेतली. विशेष असे एसपींनी मंगळवारीच ठाणेदारांना अवैध धंदे बंद करण्याबाबत निर्देश दिले होते. त्यानंतरही शारदा चौकासह अन्य ठिकाणावरील जुगार अड्डे सुरू होते, हे विशेष.
‘लोकमत’ने बुधवारी ‘अप्सरा चौकातील जुगार मुंबईत गाजला’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले. त्याची दखल घेऊनच एसपींनी जुगार अड्ड्यांविरुद्ध थेट भूमिका घेतली. (जिल्हा प्रतिनिधी)
स्वत: जिल्हा पोलीस अधीक्षकांनी धाड घालून शारदा चौकातील जुगार पकडल्याने या बीटच्या जमादाराला निलंबित केले जाणार असल्याची माहिती आहे. वडगाव रोड ठाणेदार व यवतमाळच्या एसडीपीओवर नेमकी काय कारवाई होते, याकडे लक्ष लागले आहे. कारण त्यांच्या छुप्या संरक्षणाशिवाय जुगार अड्डे चालू शकत नाही, असे पोलीस वर्तुळातूनच दाव्याने सांगितले जाते.
एसपींनी घाड घालून अवैध धंद्यांबाबत आपले धोरण पुन्हा स्पष्ट केले. जिल्ह्यात शंभरावर जुगार अड्डे आहेत. त्याची यादी सहज उपलब्ध हाईल. एकट्या यवतमाळ शहरातच १२ ते १५ मोठे अड्डे आहेत. हे अड्डे ठाणेदार आता खरोखरच बंद करतात काय आणि त्यासाठी आणखी किती वेळ घेतात, हे पाहणे महत्वाचे ठरते.

Web Title: SPA's gambling racket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.