सोयाबीन खरेदीला २४ दिवसांची मुदतवाढ; ४० हजार क्विंटल सोयाबीन गोदामाच्या बाहेर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 18:01 IST2025-02-11T17:59:33+5:302025-02-11T18:01:42+5:30
Yavatmal : जिल्हास्तरावर यंत्रणेला आदेशाची प्रतीक्षा

Soybean procurement extended by 24 days; 40,000 quintals of soybeans outside the godown
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : हमी दराच्या तुलनेत खुल्या बाजारात सोयाबीनचे दर घसरले आहेत. यामुळे शेतकऱ्यांनी सोयबीन हमी केंद्रावर सोयाबीन विक्रीसाठी पुढाकार घेतला आहे. याच परिस्थितीत शेतकऱ्यांच्या घरात सोयाबीन असताना मुदत संपल्याने शेतकरी अडचणीत सापडले होते. या संदर्भात सोयाबीन खरेदीकरिता राज्याने केंद्राकडे प्रस्ताव पाठविला होता. या प्रस्तावाला केंद्र शासनाने मुदतवाढ दिली आहे. मात्र याचे आदेश जिल्हा पातळीवर पोहचले नव्हते.
जिल्ह्यात खरेदी झालेल्या सोयाबीनपैकी ४० हजार क्विंटल सोयाबीन शासकीय गोदामात पोहचायचे आहे. याशिवाय राज्यभरात दोन लाख ७५ हजार क्विंटल सोयाबीनची खरेदी बाकी आहे. सोमवारी रात्री उशिरा या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याची चर्चा आहे. २४ दिवसांची ही मुदतवाढ असलीतरी त्याचे लेखी आदेश जिल्ह्यात पोहचायचे आहेत.
खरेदी संस्थांची जुळवाजुळव
यवतमाळ जिल्ह्यात मार्केटिंग फेडरेशन आणि विदर्भ कॉ-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनने सोयाबीन खरेदी आणि राहिलेले ग्राहक यांची जुळवाजुळव करण्याचे काम सुरू केले आहे. यातील वंचित शेतकऱ्यांना दिलासा मिळेल.
अनेकांचे चुकारे बाकी
जे सोयाबीन खरेदी करण्यात आले ते सोयाबीन शासकीय गोदामात पोहचले तरच त्याचे चुकारे मिळतात. जिल्ह्यात सोयाबीन खरेदी करण्यात आले. मात्र ४० हजार क्विंटल सोयाबीन गोदामात पोहचायचे आहेत. यामुळे अशा शेतकऱ्यांचे चुकारे थांबले आहेत. यातून शेतकरी अडचणीत आहेत.
सीएसी केंद्रातील त्या शेतकऱ्यांच्या नोंदी दुर्लक्षित
- उमरखेड, पुसद आणि महागाव तालुक्यात अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी ऑनलाईन नोंद सीएससी केंद्रातून केली होती. या नोंदी हमी केंद्रावर झाल्याच नाहीत. या शेतकऱ्यांचे आकडे सरकार दरबारी नाही.
- ज्या शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंद 3 नाही, अशा शेतकऱ्यांच्या नोंदी घेण्यासाठी वाढीव काळात लक्ष दिले तरच त्याचा लाभ होणार आहे. मध्यंतरी मुदत वाढल्यानंतरही अशा नोंदीबाबत विचार झाला नाही. यामुळे शेतकऱ्यांना सोयाबीन विकता आले नाही.