हरिओम बघेल ।लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : आयुष्यभर गांधी विचाराने जगणाऱ्या तालुक्यातील लोणी येथील नंदापुरे परिवाराने सहस्रचंद्रदर्शन सोहळ्यातून सामाजिक बांधिलकी जोपासली. गावातील सहा गरीब कुटुंबातील मुलींचे शुभमंगल या सोहळ्यात करून समाजापुढे नवा पायंडा पाडला. बुधवारी लोणी येथे पार पडलेल्या या आगळ्यावेगळ्या सोहळ्याचे अनेकजण साक्षीदार ठरले.जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य आणि गांधी विचारांचा वारसा जपणारे द.तु. नंदापुरे यांचा ८१ वा आणि त्यांच्या पत्नी वेणूताई यांचा ७१ वा वाढदिवस अर्थात सहस्रचंद्रदर्शन सोहळा करण्याचे ठरले. आयुष्यभर आदर्श जोपासणाऱ्या या कुटुंबाला हा सोहळा तसा मनाला पटणारा नव्हता. कोणत्याही समारंभावर अनाठाई खर्च करणे त्यांना आवडणारे नव्हते. त्यातूनच त्यांचे चिरंजीव अॅड.जयंत नंदापुरे यांनी या सोहळ्याला सामाजिक किनार देण्याचा निर्णय घेतला.गावातील गरीब कुटुंबातील मुलींचे लग्न या सोहळ्यात लावण्याचा निश्चिय केला. गावातीलच रोजमजुरी करणाऱ्या सहा कुटुंबातील मुलींचे या सोहळ्यात लग्न लावून दिले. बुधवारी हा सोहळा येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात पार पडला. सर्व गाव या सोहळ्यात सहभागी झाले होते.कार्यक्रमाला व्यसनमुक्ती सम्राट मधुकर महाराज खोडे, योगचित्तम स्वामी, जीवन पाटील, सुशीलाताई पाटील, लेखक श्रावण शिरसाट यांच्यासह शेकडो मान्यवर उपस्थित होते. विवाह सोहळ्यानंतर गावातून वधू-वरांची मिरवणूकही काढण्यात आली. एक आदर्श सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा करून नंदापुरे परिवाराने इतरांपुढे नवा पायंडा पाडला.विविध संस्थांना मदतीचा हातया सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्यात सहा मुलींचे लग्न पार पाडले. एवढेच नाही तर विविध सामाजिक संस्थांनाही मदतीचा हात दिला. दोला महाराज वृद्धाश्रम उमरीपठार, सहारा अनाथाश्रम देवराई जि.बीड, रामकृष्ण मठ वसतिगृह यवतमाळ, मध्यस्थ दर्शन साधक परिवार यवतमाळ, प्रश्नचिन्ह आश्रमशाळा मंगरूळ चव्हाळा या सर्वांना मदतीचा हात दिला, तर मृत्युमुखी पडलेला तरुण शेतकरी संतोष होळकर आणि वणी येथील शहीद जवान विकास जनार्दन कुडमेथे यांच्या परिवारालाही नंदापुरे कुटुंबाने मदत केली. असा हा आगळावेगळा सोहळा लोणी येथे पार पडला.
सहस्रचंद्रदर्शन सोहळ्यात सहा शुभमंगल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 22:38 IST
आयुष्यभर गांधी विचाराने जगणाऱ्या तालुक्यातील लोणी येथील नंदापुरे परिवाराने सहस्रचंद्रदर्शन सोहळ्यातून सामाजिक बांधिलकी जोपासली. गावातील सहा गरीब कुटुंबातील मुलींचे शुभमंगल या सोहळ्यात करून समाजापुढे नवा पायंडा पाडला.
सहस्रचंद्रदर्शन सोहळ्यात सहा शुभमंगल
ठळक मुद्देसामाजिक जाणीव : लोणीच्या नंदापुरे परिवाराचा स्तुत्य उपक्रम