सायफळ येथे वाहनातून सहा लाख रुपये जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2019 19:50 IST2019-03-28T19:50:18+5:302019-03-28T19:50:38+5:30
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात विविध ठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्यात येत आहे.

सायफळ येथे वाहनातून सहा लाख रुपये जप्त
यवतमाळ : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात विविध ठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. सायफळ (ता. घाटंजी) येथे वनविभाग चेक पोस्टवर नाकाबंदीदरम्यान बोलेरो पिकअप वाहनाची तपासणी करीत असताना सहा लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली.
सारकणीकडून येणारी बोलेरो पिकअप वाहन (क्रमांक एमएच 26 – एडी 5154) सायफळ येथील वनविभागाच्या चेक पोस्टवर तपासणीकरीता थांबविण्यात आली. यावेळी वाहनात एका पॉलेथिनमध्ये नगदी रोकड दिसून आली. याबाबत चालक प्रवीण मेश्राम (रा. दवाखाना उमरी, ता. केळापूर) याला विचारणा केली असता सदर रक्कम मालक विक्की उर्फ मनोज सिंघानिया यांची असून सारकणी येथील बनाणी सेठ यांच्याकडून लोखंडाच्या वसुलीची आणल्याचे सांगितले.
मात्र याबाबत चालकाने कुठलाही कागदोपत्री पुरावा सादर केला नाही. वाहनातून मिळालेल्या रकमेमध्ये दोन हजार रुपयांच्या 107 नोटा (2 लक्ष 14 हजार रुपये), 500 रुपयांच्या 160 नोटा (80 हजार रुपये), 200 रुपयांच्या 455 नोटा (91 हजार रुपये), 100 रुपयांच्या 2100 नोटा (2 लक्ष 10 हजार रुपये), 50 रुपयांच्या 100 नोटा (5 हजार रुपये) असे एकूण 6 लक्ष रुपये जप्त करण्यात आले.
रकमेबाबत कोणताही कागदोपत्री पुरावा नसल्यामुळे कलम 102 सीआरपीसीप्रमाणे जप्त करण्यात आली आहे. सदर बाब निवडणूक आयोग, आयकर विभाग, जिल्हा निवडणूक समिती यांच्याकडून खात्री करून योग्य कार्यवाही करण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात घाटंजी येथील उप-कोषागार कार्यालयात ठेवण्यात आली आहे. स्थिर सर्वेक्षण पथकाने केळापूर तालुक्यातील पिंपळखुटी चेकपोस्टवर 12 लक्ष 2 हजार 520 रुपयांचे साहित्य (इनोव्हा कार व बिअर बॉक्स) जप्त केला .