उमरखेड शहरातील परिस्थिती ४८ तासानंतर आली पूर्वपदावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2021 05:00 IST2021-12-20T05:00:00+5:302021-12-20T05:00:07+5:30
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील हेे दोन दिवसांपासून शहरात तळ ठाेकून आहे. राज्य राखीव पोलीस दलाच्या दोन तुकड्यांसह आरसीपीची दोन प्लाटून व इतर दोन कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. दोन दिवसापूर्वी घडलेल्या घटनेत पोलिसांनी दोन्ही गटातील १४ आरोपींना ताब्यात घेतले. त्यापैकी आठ आरोपींची २५ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली.

उमरखेड शहरातील परिस्थिती ४८ तासानंतर आली पूर्वपदावर
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : सोशल मीडियावर आपत्तीजनक पोस्ट व्हायरल झाल्याने १७ डिसेंबरच्या रात्री शहरात तोडफोड व जाळपोळीची घटना घडली. त्यामुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलीस प्रशासनाने तगडा बंदोबस्त तैनात करून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण केली. त्यामुळे येथील परिस्थिती पूर्वपदावर येत आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील हेे दोन दिवसांपासून शहरात तळ ठाेकून आहे. राज्य राखीव पोलीस दलाच्या दोन तुकड्यांसह आरसीपीची दोन प्लाटून व इतर दोन कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. दोन दिवसापूर्वी घडलेल्या घटनेत पोलिसांनी दोन्ही गटातील १४ आरोपींना ताब्यात घेतले. त्यापैकी आठ आरोपींची २५ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली. या सहा दिवसात उर्वरित आरोपींची नावे समोर येताच कारवाई केली जाईल, असे ठाणेदार अमोल माळवे यांनी सांगितले.
रविवारी सकाळी १० वाजता शहरात पोलिसांनी पथसंचलन केले. परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी व्यापाऱ्यांना जिल्हा पोलीस अधीक्षकांनी आवाहन केले. त्यामुळे व्यापाऱ्यांनी रविवारी आपली दुकाने उघडली. बाजारपेठ खुली झाली. तीन प्रकारच्या गुन्ह्यांतील आणखी ४ जणांना ताब्यात घेण्यात आले. आत्तापर्यंत ११ जणांना अटक करण्यात आल्याची माहिती डॉ. भुजबळ यांनी दिली.
पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक
- पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील यांनी शनिवारी पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक घेतली. त्यांनी शहरात शांतता राहण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. या बैठकीला प्रतिष्ठित नागरिक, नगरसेवक, शांतता समिती सदस्य, व्यापारी, महसूलचे अधिकारी उपस्थित होते.