शिवसेनेची सरशी, भाजपाचे अपयश
By Admin | Updated: December 27, 2014 02:34 IST2014-12-27T02:34:13+5:302014-12-27T02:34:13+5:30
महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांची अखेर यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाल्याने शिवसेनेची सरशी झाली असून भाजपाचे अपयश पुन्हा एकदा पाहायला मिळाले आहे.

शिवसेनेची सरशी, भाजपाचे अपयश
यवतमाळ : महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांची अखेर यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाल्याने शिवसेनेची सरशी झाली असून भाजपाचे अपयश पुन्हा एकदा पाहायला मिळाले आहे.
यवतमाळच्या पालकमंत्रीपदासाठी भाजपा आणि शिवसेनेत जोरदार रस्सीखेच पहायला मिळाली. एका आमदारावर मंत्रिमंडळात वर्णी लावून घेणारे संजय राठोड जिल्हाभर शिवसेनेचे नेटवर्क उभे करतील, पुढील निवडणुकांमध्ये भाजपाला याचा त्रास होईल, अशी भीती जिल्ह्यातील भाजपाच्या नेत्यांमध्ये आहे. त्यामुळेच शिवसेनेला ‘फाईट’ देण्यासाठी जिल्ह्यात भाजपालाही मंत्रीपद द्यावे, अशी मागणी केली गेली होती. परंतु भाजपाला ही संधी मिळाली नाही. संजय राठोड राज्यमंत्री झाल्यानंतर आता किमान त्यांना यवतमाळचे पालकमंत्री तरी होऊ देऊ नये, अशी भूमिका भाजपाच्या गोटातून मांडली गेली. त्यासाठी जोरदार मोर्चेबांधणीही झाली. जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी अकोल्याचे रणजित पाटील, अमरावतीचे प्रवीण पोटे पाटील असा पसंती क्रम ठेवला गेला. गुरुवारी जिल्हा दौऱ्यावर आलेल्या ना. पाटील यांच्याशी या विषयावर चर्चाही झाल्याचे बोलले जाते. परंतु आज जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून संजय राठोड यांच्या नावाची घोषणा झाल्याने भाजपाचा हिरमोड झाला आहे.
जिल्ह्यात भाजपाचे पाच आमदार असूनही त्यातील एकाचीही युतीच्या मंत्रीमंडळात वर्णी न लागल्याने आधीच भाजपाच्या गोटात नाराजी पहायला मिळते. त्यातच सेनेला राज्यमंत्री पदासोबत पालकमंत्री पदही बहाल केले गेल्याने या नाराजीत भर पडली आहे. भविष्यात भाजपा-सेनेतील या अंतर्गत नाराजीतून खटके उडण्याची शक्यताही नाकारता येत नाही. शिवसेनेला शह देण्यासाठी त्या-त्या जिल्ह्यात भाजपालाही मंत्रीमंडळात स्थान मिळावे, अशी सूचना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातर्फे भाजपा सरकारला केली गेली. त्यामुळे जिल्ह्यातील भाजपा नेत्यांचे भविष्यातील विस्ताराकडे लक्ष लागले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)