लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव : यवतमाळ येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सात रेती तस्करांना गजाआड केले. त्यांच्याजवळून २५ लाख ५२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.संचारबंदीत प्रशासनातर्फे सामान्य नागरिकांना घराबाहेर पडू नका, असे आवाहन केले जात आहे. मात्र याच संधीचा लाभ घेत रेती तस्कर रेतीची चोरटी वाहतूक करीत आहे. ही बाब उघडकीस आल्यामुळे पोलिसांनी आता रेती तस्करांवर लक्ष केंद्रित केले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेला रेती तस्करांच्या मुसक्या आवळण्याचे आदेश दिले. त्यानुसार गेल्या तीन दिवसात महागाव आणि खंडाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध एलसीबीने मोहीम उघडली. मंगळवारी एलसीबीचे पीएसआय नीलेश शेळके व पथकाने पैनगंगा व पूस नदीपात्रात रेती तस्करांवर कारवाई केली.पैनगंगा व पूस नदीपात्रातून ट्रक व इतर वाहनाद्वारे रेती तस्करी केली जात होती. गुंज, खडका मार्गे सदर रेती पुसदला नेली जात होती. विशेष म्हणजे, ट्रकमालक आपल्या स्वत:च्या फॉर्च्युनर वाहनाने पायलटींग करीत होता. रस्त्यावर कुणी नाही याची खातरजमा केली जात होती. एलसीबीने खडका चौकात सापळा रचला. तेथे फॉर्च्युनरला थांबवून तपासणी केली. वाहनात चालकासह तीन जण बसून होते. त्यांना मध्यरात्री फिरण्याचे कारण विचारले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. तपासणीत पोलिसांना फॉर्च्युनरमध्ये सहा फावडे, सहा घमेले मिळून आले. त्यावरून पोलिसांनी अधिक चौकशी केली असता मागून रेती भरलेले वाहन येत असल्याचे त्यांनी कबूल केले.पोलिसांनी फॉर्च्युनरमधील नितीन गुलाबराव पाचकोरे (३८), दिलीप प्रल्हाद चव्हाण (२७), ज्ञानेश्वर रामराव चव्हाण (३३) आणि पांडुरंग किसन कबले (२६) सर्व रा.कृष्णनगर पुसद यांना ताब्यात घेतले. तेवढ्यात मागून एक टिप्पर आला. त्यात रेती आढळली. परवान्याबाबत विचारणा केली असता चालक, वाहकाने परवाना नसल्याचे कबूल केले. त्यावरून एलसीबीने राहुल नामदेव राठोड (२९), मिलिंद भिमू चव्हाण (२२) आणि विलास कैलास राठोड (३५) सर्व रा.कृष्णनगर पुसद यांना ताब्यात घेतले. या सातही जणांकडून पोलिसांनी पाच मोबाईल, एक फॉर्च्युनर वाहन, रेती भरण्याचे साहित्य व रेती भरलेला टिप्पर असा एकूण २५ लाख ५२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. सातही जणांवर महागाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.ही कारवाई नीलेश शेळके यांच्या नेतृत्वात गोपाल वास्टर, पंकज पातूरकर, मुन्ना आडे, रेवन जागृत, नागेश वास्टर आदींनी पार पाडली.तस्करांना संचारबंदीचा लाभकोरोनामुळे देशात संचारबंदी लागू आहे. पोलीस व इतर विभाग कोरोनाविरुद्ध लढाई देत आहे. पोलीस बंदोबस्तात तैनात आहे. त्याचाच लाभ घेत महागाव तालुक्यात रेती तस्कर सक्रिय झाले आहे. महसूल व पोलीस यंत्रणा संचारबंदीत व्यस्त असल्याने त्यांचे चांगलेच फावत आहे. मात्र पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी रेती तस्करी लक्षात घेऊन आता स्थानिक गुन्हे शाखेला कारवाईचे आदेश दिले. त्यामुळे तालुक्यात ठिकठिकाणी रेती तस्करी उघडकीस येत आहे.
महागावात सात रेती तस्कर अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 05:00 IST
एलसीबीने खडका चौकात सापळा रचला. तेथे फॉर्च्युनरला थांबवून तपासणी केली. वाहनात चालकासह तीन जण बसून होते. त्यांना मध्यरात्री फिरण्याचे कारण विचारले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. तपासणीत पोलिसांना फॉर्च्युनरमध्ये सहा फावडे, सहा घमेले मिळून आले. त्यावरून पोलिसांनी अधिक चौकशी केली असता मागून रेती भरलेले वाहन येत असल्याचे त्यांनी कबूल केले.
महागावात सात रेती तस्कर अटकेत
ठळक मुद्दे२५ लाखांचा मुद्देमाल जप्त : यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेची सलग कारवाई