हंगाम संपला, कर्ज मात्र कायम
By Admin | Updated: March 18, 2015 02:20 IST2015-03-18T02:20:54+5:302015-03-18T02:20:54+5:30
निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसलेल्या महागाव तालुक्यातील शेतकरी पुरता हतबल झाला आहे. हंगाम संपला तरी शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर कायम आहे.

हंगाम संपला, कर्ज मात्र कायम
रितेश पुरोहित महागाव
निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसलेल्या महागाव तालुक्यातील शेतकरी पुरता हतबल झाला आहे. हंगाम संपला तरी शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर कायम आहे. यावर्षी तालुक्यातील शेतकऱ्यांनी विविध बँकांकडून १२० कोटी कर्जाची उचल केली. मात्र नैसर्गिक संकटाचा सामना करताना कर्जाची परतफेड करणे शक्यच झाले नाही. सर्वच शेतकरी कर्जाच्या खाईत लोटले गेले आहेत.
महागाव तालुक्यातील शेतकरी गत काही वर्षांपासून आसमानी संकटाचा सामना करीत आहे. कधी अतिवृष्टी, कधी गारपिट तर कधी कोरड्या दुष्काळाचा सामना करावा लागतो. दरवर्षी शेतात उद्ध्वस्त होणारे पिक पाहून तो खचतो. मात्र नव्या दमाने हंगाम सुरू झाला की कामाला लागतो. शेतात पेरणी करतो. त्यासाठी विविध बँकांचे उंबरठे झिजवितो. यावर्षी तालुक्यातील ५० हजार शेतकऱ्यांनी विविध बँकातून कर्ज घेतले. त्यात जिल्हा बँकेचे ८५ कोटी, युनियन बँकेचे २० कोटी, स्टेट बँकचे सात कोटी, सेंट्रल बँकेचे पाच कोटी असे १२० कोटी रुपयांचे कर्ज शेतकऱ्यांनी घेतले. या बँकांनी शेतकऱ्यांना खरीप आणि रबी हंगामासाठी कर्ज दिले. मात्र हाती आलेल्या पिकाची परिस्थिती पाहता केवळ ३० ते ४० कोटी रुपयांचा शेतमाल शेतकऱ्यांच्या हातात आल्याचे दिसत आहे. त्यामुळे कोणताही शेतकरी कर्जाची परतफेड करू शकला नाही. १०० कोटींवर कर्ज शेतकऱ्यांकडे थकीत आहे. बँकांनी शेतकऱ्यांना कर्जासाठी नोटीस बजावल्या. परंतु शेतातच पिकले नाही तर बँकेचे कर्ज कसे फेडावे असा प्रश्न आहे. यावर्षी सुरुवातीला अपुऱ्या पावसाने संपूर्ण खरीप हंगाम उद्ध्वस्त झाला. एकरी एक पोतेही सोयाबीन शेतकऱ्यांना झाले नाही. महागाव तालुक्यातील उद्ध्वस्त झालेल्या शेतीची पाहणी करण्यासाठी केंद्राचे पथक येऊन गेले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मुडाणा येथील एका शेताची पाहणी केली. शेतकऱ्यांवर मोठे संकट आले असताना शासनाने मात्र मदतीच्या नावाने हात आखडता घेतला आहे. अनेक शेतकऱ्यांपर्यंत तर मदत अद्यापही पोहोचली नाही. बँकांमध्ये शेतकरी गर्दी करून आहे. अनेक शेतकऱ्यांचे बँक खाते नसल्याने मदत परत जाण्याची भीती आहे.
खरीप हंगाम अपुऱ्या पावसाने उद्ध्वस्त झाला असताना आता रबी गारपिटीने उद्ध्वस्त होत आहे. गत १५ दिवसांपासून ढगाळी वातावरण आहे. तीनदा अवकाळी पावसाने झोडपून काढले. गहू, हरभरा, भाजीपाला, संत्रा, केळी आदी पिकांचे नुकसान झाले आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांच्या हातात पैसाच दिसत नाही. त्यामुळे बँकेचे कर्ज भरावे कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे.