यवतमाळात प्रथमच झाली सागरी बगळ्याची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2021 19:42 IST2021-11-13T19:40:06+5:302021-11-13T19:42:12+5:30
Yawatmal News यवतमाळ जिल्ह्यात व विदर्भात दुर्मिळ असलेल्या ‘सागरी बगळा’ या पक्ष्याची यवतमाळात शनिवारी प्रथमच नोंद झाली.

यवतमाळात प्रथमच झाली सागरी बगळ्याची नोंद
यवतमाळ : जिल्ह्यात व विदर्भात दुर्मिळ असलेल्या ‘सागरी बगळा’ या पक्ष्याची यवतमाळात शनिवारी प्रथमच नोंद झाली.
वनविभाग व कोब्रा ॲडव्हेंचर ॲन्ड नेचर क्लबच्या संयुक्त विद्यमाने यवतमाळ शहरानजीक टेभुंनी तलावावर पक्षी परीक्षण करण्यात आले. यावेळी अमोलकचंद महाविद्यालयाचे प्रा. डाॅ. प्रवीण जोशी यांना सागरी बगळा हा पक्षी आढळला. इंग्रजीत या पक्ष्याला वेस्टर्न रिफ इग्रेज म्हणतात. प्रा. जोशी यांनी ‘ई-बर्ड’ या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या संकेतस्थळावर शोध घेतला असता या पक्ष्याची विदर्भातील ही दुसरीच नोंद असल्याचे निष्पन्न झाले. यापूर्वी तो अकोला येथे आढळल्याची नोंद आहे. मात्र यवतमाळात त्याची पहिल्यांदाच नोंद झाली.
हा पक्षी छोट्या बगळ्यासारखा असून, त्याचा रंग निळसर-काळपट आहे. गळ्यावर पांढरा धब्बा आणि पाय पिवळसर हिरवे असतात. समुद्राचे फेसाळणारे पाणी, किनारी खडकाळ दगडात साठणारे पाणी येथे त्याचा मुख्य वावर असतो. परंतु, स्थलांतरादरम्यान काही काळासाठी तो यवतमाळात थांबला, असे प्रा. डाॅ. जोशी म्हणाले. या पक्षी निरीक्षण कार्यक्रमाला श्याम जोशी, मंगेश ठाकूर, वनपाल बी. बी. मडावी, वनरक्षक एच. डी. ढोले, एस. एस. जिरापुरे, सूरज उद्रके, ए. एफ. तोंडरे, सोनल ताकसांडे आदी उपस्थित होते. या पक्ष्याच्या नोंदीसाठी उपवनसंरक्षक केशव वाबळे यांनी सर्वांचे कौतुक केले.