‘मेडिकल’मध्ये औषधांचा तुटवडा
By Admin | Updated: June 9, 2017 01:40 IST2017-06-09T01:40:28+5:302017-06-09T01:40:28+5:30
येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अनेक महत्त्वाची व जीवनावश्यक औषधे उपलब्ध होत नाही.

‘मेडिकल’मध्ये औषधांचा तुटवडा
रूग्णांची परवड : स्थानिक खरेदी वशिलेबाजांसाठी, अॅट्राफिन इंजेक्शनच नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अनेक महत्त्वाची व जीवनावश्यक औषधे उपलब्ध होत नाही. पुरवठादारांकडून औषधी येत नसल्याची सबब पुढे करून रूग्णालय प्रशासनाने हात वर केले आहे. गरीब रूग्णांसाठी अधिष्ठातांच्या परवानगीने औषधी खरेदी करण्याची तरतूद आहे. मात्र याचा लाभ केवळ वशिला घेऊन आलेल्या रुग्णांनाच मिळतो. गरीब रूग्ण पदरमोड करून औषधांची बाहेरून खरेदी करीत आहे.
ग्रामीण भागातील रूग्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी येतात. येथे अनेक औषधांची कायम टंचाई असते. अकस्मात डॉक्टरांकडून औषधी बाहेरून आणण्यास सांगितले जाते. त्यामुळे रूग्णालय परिसरातील मेडिकल स्टोअर्समध्ये अक्षरश: रांगा असतात. शासन स्तरावरून मोठ्या प्रमाणात शासकीय रूग्णालयाच्या औषधी पुरवठ्यासाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद केली जाते. तसेच गरीब रूग्णांना आर्थिक भुर्दंड बसू नये म्हणून अधिष्ठातांच्या परवानगीने स्थानिक पातळीवर तत्काळ औषधी खरेदी करून रूग्णांना देण्याची तरतूद आहे. मात्र या प्रक्रियेत केवळ वशिला असलेल्या रूग्णालाच लाभ मिळत असल्याची ओरड सुरू आहे.
सामान्य रूग्णाला पदरमोड करून औषधांची खरेदी करावी लागते. फेब्रुवारी महिन्यापासून शासकीय रूग्णालयात ‘अॅट्रोफीन’ इंजेक्शनचा तुटवडा आहे. विष प्राशन केलेल्या व पोटदुखीने आजारी रूग्णांना हे इंजेक्शन देणे आवश्यक आहे. मात्र तुटवडा असल्याने ते बाहेरून खरेदी करून आणावे लागत आहे. त्याचा नाहक भुर्दंड गरीब रूग्णांना सोसावा लागत आहे.
इतरही अनेक महत्त्वाची औषधी रूग्णालयात उपलब्ध नाही. बाह्यरूग्ण तपासणी विभाग व आंतररूग्ण विभागात डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधांपैकी निम्मे औषध बाहेरून आणावे लागते. यामुळे शासकीय रूग्णालयातील औषधी पुरवठा विभागाच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
विष प्राशनाचे रूग्ण वाऱ्यावर
यवतमाळ जिल्हा शेतकरी आत्महत्याग्रस्त म्हणून ओळखला जातो. सातत्याने शासकीय रूग्णालयात विष प्राशन केलेल्या रूग्णांसह शेतकरीही मोठ्या प्रमाणात येतात. अशा स्थितीतही त्यासाठी रामबाण असणाऱ्या अॅट्रोपिन इंजेक्शनचा पुरवठा करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.