राजकीय द्वेषातून होत असलेली बदली रद्द करावी; मुख्याधिकाऱ्यांच्या समर्थनार्थ पालिकेपुढे समाधी आंदोलन
By सुरेंद्र राऊत | Updated: September 19, 2022 18:33 IST2022-09-19T18:29:32+5:302022-09-19T18:33:48+5:30
या समाधी आंदोलनाने एकच खळबळ उडाली.

राजकीय द्वेषातून होत असलेली बदली रद्द करावी; मुख्याधिकाऱ्यांच्या समर्थनार्थ पालिकेपुढे समाधी आंदोलन
यवतमाळ : येथील नगरपरिषद मुख्याधिकारी माधुरी मडावी यांची राजकीय द्वेषातून होत असलेली बदली रद्द करावी यासाठी जनक्षोभ उसळला आहे. यवतमाळ शहरातील जनता, राजकीय पक्ष, सामाजिक संघटना मागील पाच दिवसांपासून सातत्याने आंदोलन करीत आहे. सोमवारी दोघांनी नगरपालिकेसमोरच स्वत:ला खड्ड्यात गाडून घेत समाधी आंदोलन केले.
मुख्याधिकारी माधुरी मडावी यांची स्थानिक लोकप्रतिनिधींकडून सूड भावनेने बदली केली जात आहे. यासाठी उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री यांच्याकडे त्यांनी शिफारस केली आहे. मात्र मुख्याधिकारी व प्रशासक म्हणून मडावी यांनी शहरात अनेक कामे मार्गी लावली. त्यांच्या कामाचा धडाका पाहूनच जनमत त्यांच्या बाजूने वळले. अवेळी हाेणारी त्यांची बदली रद्द व्हावी या मागणीसाठी अशोक डेरे व हेमंत कांबळे या दोघांनी उपोषण सुरू केले.
सोमवारी त्यांनी पालिकेसमोरच रस्त्यावर मोठा खड्डा खोदून स्वत:ला त्यात पुरवून घेतले. या समाधी आंदोलनाने एकच खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून दुपारनंतर त्या दोघांना जमिनीबाहेर काढले. सीओंची बदली रद्द व्हावी यासाठी स्वाक्षरी अभियानसुद्धा राबविले जात आहे.