'त्या' बॅचमधील सहा औषधांच्या विक्रीवर राज्यभरात मनाई ! सहा वर्षाच्या मुलाच्या मृत्यूला ठरले कारण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 15:20 IST2025-10-14T15:18:54+5:302025-10-14T15:20:15+5:30
एफडीएचे आदेश : बालकाच्या मृत्यू प्रकरणानंतर खबरदारी

Sale of six medicines from 'that' batch banned across the state! Cause of death of a six-year-old boy determined?
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कळंब तालुक्यातील परसोडी येथील सहा वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नुकतीच घडली. मृत्यूपूर्वी या बालकाने यवतमाळातील एका खासगी रुग्णालयातून सर्दी, ताप आणि खोकल्यासाठी औषधे घेतली होती. त्यानंतर स्थानिक प्रशासनाकडून खबरदारी म्हणून बालकाला देण्यात आलेल्या सहा औषधांचे नमुने घेण्यात आले असून त्या बॅचच्या औषधांचे वितरण व विक्री करू नये, असे आदेशही औषधी प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. दरम्यान बालकाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही.
शिवम सागर गुरनुले रा. पिंपळखुटी ता. कळंब असे मृत बालकाचे नाव आहे. ४ ऑक्टोबर रोजी पालकांनी त्याला ताप, खोकला व उलटी यांसारख्या त्रासासाठी तारक बाल रुग्णालयात दाखल केले. औषधोपचार घेऊन बालकाला घरी नेण्यात आले. नंतर पुन्हा ६ ऑक्टोबर रोजी शिवमला तपासणीसाठी डॉ. तारक यांच्याकडे आणले. औषधी बदलवून शिवमला गावी नेण्यात आले. ७ ऑक्टोबर रोजी शिवम जेवण करीत असताना अचानक कोसळला. त्याच अवस्थेत पालकांनी शिवमला डॉ. तारक यांच्याकडे आणले. तेव्हा डॉक्टरांनी शिवमचा मृत्यू झाल्याचे सांगितले. त्यानंतर शिवमच्या मृतदेहाची वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे शवचिकित्सा करण्यात आली.
औषधी प्रशासनाने याप्रकरणी तारक बाल रुग्णालयातील मेडिकल स्टोअरमध्ये असलेल्या सात औषधांचे नमुने घेतले. शिवमला देण्यात आलेल्या औषधांची बॅच तपासून त्या बॅचच्या सर्वच औषधांची विक्री व वितरण थांबविण्यास सांगितले. सहा औषधांचे नमुने मुंबई येथे तपासणीला पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाणार आहे. तूर्त त्या बॅचच्या सहा औषधांवर संपूर्ण राज्यातच बंदी घातली आहे, असे सहायक आयुक्त औषधी एम. के. काळेश्वरकर यांनी 'लोकमत'ला सांगितले.
'त्या' बालकाच्या श्वसननलिकेत आढळले अन्नाचे कण
शिवम गुरनुले या सहा वर्षाच्या बालकाची शवचिकित्सा केली असता प्रथमदर्शनी त्याच्या श्वसननलिकेमध्ये शेंगदाण्याच्या सालीसोबत अन्नाचे अंश आढळले. पुढील तपासणीसाठी त्याचे अवयव व व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे शिवमचा खोकल्याच्या औषधामुळेच मृत्यू झाला, हा अंदाज बांधणे चुकीचे आहे. संपूर्ण तपासणी अहवाल हाती आल्यानंतरच त्याच्या मृत्यूचे कारण पुढे येईल. नागरिकांनी घाबरून न जाता डॉक्टरांच्या सल्ल्याने खोकल्याचे औषध व उपचार घ्यावे, असे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अनिल बत्रा यांनी स्पष्ट केले आहे.