‘एसटी’ चालक-वाहक कारकुनाच्या भूमिकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 23:28 IST2018-05-20T23:28:41+5:302018-05-20T23:28:41+5:30
‘एसटी’च्या उत्पन्नाचा मुख्य आधार असलेला वाहक कारकुनाच्या भूमिकेत दिसत आहे. प्रामुख्याने यवतमाळ आगारात सुरू असलेली ही परंपरा महामंडळाच्या नुकसानीला कारणीभूत ठरत आहे. एकीकडे वाहक तुटवड्याचा कांगावा केला जातो, तर दुसरीकडे त्यांचा वापर इतर विभागात होत आहे.

‘एसटी’ चालक-वाहक कारकुनाच्या भूमिकेत
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : ‘एसटी’च्या उत्पन्नाचा मुख्य आधार असलेला वाहक कारकुनाच्या भूमिकेत दिसत आहे. प्रामुख्याने यवतमाळ आगारात सुरू असलेली ही परंपरा महामंडळाच्या नुकसानीला कारणीभूत ठरत आहे. एकीकडे वाहक तुटवड्याचा कांगावा केला जातो, तर दुसरीकडे त्यांचा वापर इतर विभागात होत आहे. ही माहिती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालकांपर्यंत पोहोचली असून यावर कारवाईच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती आहे.
यवतमाळ आगारात मागील सात वर्षांपासून तिकीट वितरण शाखेत वाहकांचा वापर केला जात आहे. प्रत्यक्षात या आगारात पुरेसा कारकून वर्ग आहे. तरीही वाहकांची ड्यूटी का लावली जाते, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आरक्षणासाठी दोन खिडक्या व दोन कारकुनांची मंजूरी आहे. तिथेही तिसरा वाहक दिला जात आहे. मागील पाच वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे. हजेरीपत्रक बनविणे, पी मस्टर भरणे यासाठी वाहकांचा वापर होत आहे. वास्तविक ही जबाबदारी अलोकेशन पर्यवेक्षकाची आहे. अलोकेशनमध्ये एटीएस, टीआय, एटीआय, दोन चालक आणि वाहकांचा वापर केला जातो. तेही ठराविक लोकांनाच ही कामगिरी दिली जात आहे. अनुभवी लोकांचा फायदा इतरांना व्हावा यासाठी हा प्रकार केला जात असल्याचे उत्तर दिले जाते.
या प्रकाराला प्रतिबंध बसावा यासाठी मध्यवर्ती कार्यालयाने परिपत्रक काढले. हा प्रकार सोयीनुसार ड्यूटी करणाऱ्यांना पचणी पडला नाही. १९ मे रोजी तिकीट वितरण शाखेत अनुभव नसलेल्या कारकुनाची प्रथम पाळीत कामगिरी लावण्यात आली. सकाळी निघणारे अनेक शेड्यूल योग्यवेळी योग्य मशीन वाहकांना न मिळाल्याने निघू शकले नाही. या दिवशी सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान महामंडळाला सहन करावे लागल्याचे सांगितले जाते. याठिकाणी अनुभवी कारकुनाची कामगिरी लावली असती तर नुकसान टळले असते, असे करण्यात आलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
अतिकालीक भत्त्याचा कमी दर असलेल्या चालक-वाहकांनाच दुहेरी कामगिरीवर पाठवावे, असे महामंडळाचे निर्देश आहे. तरीही ३०० ते ३५१ रुपये दर असलेल्या आणि ठराविक चालक-वाहकांना अशी कामगिरी दिली जात आहे. ८० ते २०० रुपये दर असलेले जवळपास १५० चालक-वाहक आगारात असताना जादा दराचे चालक-वाहक पाठविण्यामागे वरिष्ठ अधिकाºयांचा काय हेतू असावा, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला आहे.