रूग्णालयाचे वास्तव उघड

By Admin | Updated: September 10, 2015 03:11 IST2015-09-10T03:11:55+5:302015-09-10T03:11:55+5:30

शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास येथील ग्रामीण रूग्णालयाला भेट दिली.

Reveal the reality of the hospital | रूग्णालयाचे वास्तव उघड

रूग्णालयाचे वास्तव उघड

तिवारी यांची भेट : वैद्यकीय अधिकाऱ्यांना धरले धारेवर, आमदारांचाही पारा भडकला
वणी : शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास येथील ग्रामीण रूग्णालयाला भेट दिली. या भेटीत रूग्णालयाचे वास्तव उघड झाले. त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.
मंगळवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास तिवारी यांचे वणीत आगमन झाले. ते सर्वप्रथम वणी-यवतमाळ मार्गावरील एका खासगी दवाखान्यात गेले. तेथे त्यांनी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेची माहिती जाणून घेतली. रूग्णांसोबत संवाद साधला. त्यानंतर ते शहरातील ग्रामीण रूग्णालय मार्गावरील दुसऱ्या दवाखान्यात गेले. तेथे डॉ. महेंद्र लोढा यांच्याशी तिवारी यांनी चर्चा केली. त्यानंतर सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास ते ग्रामीण रूग्णालयात धडकले. तेथे त्यांनी मलमपट्टी विभाग, एकात्मिक सल्ला व चाचणी केंद्र, नेत्र विभाग, दंतशल्य चिकित्सा विभाग, एक्स-रे विभाग, प्रयोगशाळा, एचआयव्ही तपासणी प्रयोगशाळा व इतर विभागांची पाहणी केली.
रूग्णालयातील दंत शल्य चिकित्सा विभाग गेल्या कित्येक दिवसांपासून डॉक्टरांअभावी बंद अवस्थेत आहे. त्यामुळे दररोज शहर व तालुक्यातील ३० ते ४० रूग्ण दवाखान्यात येऊन परत जात असल्याचे यावे उघड झाले. त्यानंतर त्यांनी प्रयोगशाळेची पाहणी केली. तेथे काही अत्याधुनिक मशीन बंद अवस्थेत आढळल्या. कुणाला काही दिसू नये म्हणून त्या मशीनवर संबंधित तज्ज्ञांनी चक्क कापड झाकून ठेवले होते. मात्र तिवारी यांनी तो कापड बाजूला सारून पाहिले असता, मशीन बंद आढळली. याबाबत त्यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ.माधुरी कांबळे यांना विचारणा केली असता, त्यांनी उडवाडवीची उत्तरे दिली.
आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनीसुद्धा डॉ.कांबळे ग्रामीण रूग्णालयाकडे कमी, तर खासगी दवाखान्याकडे अधिक लक्ष देत असल्याचा थेट आरोप केला. त्यामुळे आमदार व वैद्यकीय अधिकाऱ्यांमध्ये चांगलीच जुुंपली होती. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.के.झेड.राठोड, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.तरोडेकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.पांडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.विकास कांबळे, अरूण डवरे उपस्थित होते. तिवारी व बोदकुरवार यांनी रूग्णांना चांगली सुविधा देण्याचे निर्देश वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले. त्यांनी वॉर्ड क्रमांक एकची पाहणी केली असता, काही रूग्णांनी घरून चादर व ब्लँकेट आणल्याचे दिसून आले. रूग्णालयात खाटांची कमतरता असल्याने एक महिला रूग्ण खाली विश्रांती घेत होती. त्यामुळे तिवारी यांचा राग अनावर झाला होता. यानंतर त्यांनी रूग्णालयात आलेल्या रूग्णांशी संवाद साधला. काही कर्मचाऱ्यांना रूग्णालयात दौरा असल्याची चुणूक लागताच ते वेळेवर उपस्थित झाल्याचेही यावेळी उघड झाले.
सामाजिक कार्यकर्ते नारायण गोडे यांनी परिसरातील घाण यावेळी त्यांच्या निदर्शनास आणून दिली. येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ.चंद्रकांत खांबे रजेवर आहे. त्यामुळे तिवारी यांनी डॉ.कांबळे यांच्याकडून रूग्णालयाची माहिती घेतली. यावेळी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, उपविभागीय अधिकारी शिवानंद मिश्रा, तहसीलदार रणजित भोसले, विजय पिदुरकर आदी उपस्थित होते. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Reveal the reality of the hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.