पुसद अर्बन बॅंकेवर निर्बंध, ठेवीदार आले अडचणीत, पाच हजारांचा मिळणार विड्रॉल : राज्यात ३८ शाखा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 14:56 IST2025-11-10T14:55:57+5:302025-11-10T14:56:16+5:30
Pusad Urban Bank: यवतमाळ जिल्ह्यातील द पुसद अर्बन को-ऑप. बॅंकेच्या व्यवहारावर ७ नोव्हेंबरपासून रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने निर्बंध लादले आहेत. या बॅंकेच्या ३८ शाखा असून, ३६ हजारांवर सभासद आहेत. बँकेकडे ७५० कोटींच्या ठेवी होत्या. त्यापैकी ४०० कोटींचे कर्ज वितरण बॅंकेने केले आहे.

पुसद अर्बन बॅंकेवर निर्बंध, ठेवीदार आले अडचणीत, पाच हजारांचा मिळणार विड्रॉल : राज्यात ३८ शाखा
यवतमाळ - जिल्ह्यातील द पुसद अर्बन को-ऑप. बॅंकेच्या व्यवहारावर ७ नोव्हेंबरपासून रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने निर्बंध लादले आहेत. या बॅंकेच्या ३८ शाखा असून, ३६ हजारांवर सभासद आहेत. बँकेकडे ७५० कोटींच्या ठेवी होत्या. त्यापैकी ४०० कोटींचे कर्ज वितरण बॅंकेने केले आहे.
बँकेचे सर्वेसर्वा शरद आप्पाराव मैंद यांच्यावर नागपुरातील कंत्राटदाराच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल झाला. त्या कंत्राटदाराला मैंद यांनी भारती मैंद पतसंस्थेतून कर्ज दिले होते. या कारवाईत मैंद यांना ३१ दिवस कारागृहात राहावे लागले. त्यामुळे भीतीतून ठेवीदारांनी ३१ दिवसांत जवळपास ३५० कोटींच्या ठेवी काढल्या. याचा परिणाम बॅंकेच्या दैनंदिन व्यवहारावर झाला. आरबीआयने बॅंकेच्या व्यवस्थापनाला त्याबाबतची सूचनाही दिली होती.
व्यवहारावर मर्यादा
नवीन कर्ज प्रकरण मंजूर करता येणार नाही. ॲडव्हान्स देता येणार नाही. नवीन गुंतवणूक करता येणार नाही. नवीन ठेवीसुद्धा स्वीकारता येणार नाही. बँकेला कर्जही घेता येणार नाही किंवा मालमत्तेची विक्री करता येणार नाही.
खात्यांमधून ५ हजार रुपयेच काढता येतील. कर्ज ठेव सेटऑफला काही अटींवर परवानगी राहील. आवश्यक खर्च ज्यामध्ये कर्मचाऱ्यांंचे पगार, भाडे, वीज बिल हे करण्याची परवानगी आरबीआयने दिली आहे. निर्बंध ७ मे २०२६ पर्यंत असतील.
राज्यातील या प्रमुख शहरांमध्ये शाखा : मुंबई-वाशी, पुणे, कोल्हापूर, शिर्डी, नागपूर, अमरावती, अकोला, नांदेड, वसतम (हिंगोली), यवतमाळसह सर्वच प्रमुख महानगरांमध्ये बँकेच्या शाखा आहेत.