गुन्हेगारांची माहिती द्या...खाकी आपलीच आहे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 23:50 IST2018-03-13T23:50:09+5:302018-03-13T23:50:09+5:30
चोरी, मारामारी, दरोडे आणि खून... अशा घटनांनी शहर सध्या मानसिक भूकंपाचे धक्के अनुभवत आहे. स्लम असो की उच्चभ्रू वस्ती, उघड-उघड गुन्हे घडत आहेत.

गुन्हेगारांची माहिती द्या...खाकी आपलीच आहे
ऑनलाईन लोकमत
यवतमाळ : चोरी, मारामारी, दरोडे आणि खून... अशा घटनांनी शहर सध्या मानसिक भूकंपाचे धक्के अनुभवत आहे. स्लम असो की उच्चभ्रू वस्ती, उघड-उघड गुन्हे घडत आहेत. लोक डोळ्यादेखत गुन्हे पाहूनही गप्प बसतात. अशावेळी ‘पोलीस आपल्या’ रक्षणासाठी आहेत, ही भावना लोकांच्या मनात निर्माण करण्याचे प्रयत्न जिल्हा पोलीस दलाने सुरू केले आहे. त्यासाठी चौका चौकात थेट पोलीस ठाण्यांचे संपर्क क्रमांक लावण्यात आले आहेत.
यवतमाळात टोळी युद्धाचे फटके सामान्य माणसांना बसत आहेत. कोणता माणूस कोणत्या टोळीचा सदस्य आहे, हेही सर्वसामान्यांना माहिती नाही. भरचौकात साधा गाडीचा धक्का लागला तरी चाकू दाखविण्यापर्यंत वाद होत आहेत. या सर्व परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हा पोलीस दलाने संवेदनशील चौकांमध्ये शिपाई उभे करून ठेवले आहेत. पण जोपर्यंत पोलिसांना सामान्य नागरिकांची मदत मिळत नाही, तोपर्यंत शहरात लपून बसलेल्या गुन्हेगारांवर वचक ठेवणे अशक्य आहे.
म्हणूनच पोलीस आपले आहेत, ही भावना नागरिकांच्या मनात निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जिल्हा पोलीस दलाने ‘आपली खाकी’ असे मोठ मोठे बॅनर तयार करून शहरात सर्वत्र लावले आहेत. एखाद्या कुटुुंबाला पूर्ण संरक्षण देणारे पोलीस, असे मार्मिक चित्र या बॅनरवर दिसते. तर सोबतच शहरातील सर्व पोलीस ठाण्यांचे संपर्क क्रमांकही त्यावर छापण्यात आले आहे. आपल्या परिसरात कुठेही गुन्हेगारी स्वरुपाची घटना घडत असेल, गुन्हेगारांचा वावर आढळत असेल, तर नागरिकांनी लगेच पोलिसांशी संपर्क करून माहिती द्यावी, असे आवाहन या बॅनरमधून करण्यात आले आहे. अण्णा भाऊ साठे चौक, सम्यक क्रांती चौक, शाहू पहेलवान चौक, महात्मा फुले चौक, नालंदा चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर आदी परिसरात ‘आपली खाकी’चे फलक नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
पोलीस आणि नागरिकांत आपलेपणा निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. आम्ही सर्वच भागात हे फलक लावले आहेत. त्याचा चांगला प्रतिसादही मिळत आहे. ज्या भागातून पोलिसांपर्यंत माहिती यायला वेळ लागतो, त्या भागावर विशेष भर दिला जात आहे.
- एम. राज कुमार,
जिल्हा पोलीस अधीक्षक