खरंच तुम्ही, शुद्ध पाणी पिता ?
By Admin | Updated: April 25, 2015 01:57 IST2015-04-25T01:57:11+5:302015-04-25T01:57:11+5:30
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे नळाला येणारे पाणी शुद्ध आहे, हा केवळ आपला भ्रम आहे.

खरंच तुम्ही, शुद्ध पाणी पिता ?
विलास गावंडे यवतमाळ
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे नळाला येणारे पाणी शुद्ध आहे, हा केवळ आपला भ्रम आहे. वितरण व्यवस्थेतील दोषामुळे किंवा एखाद्या ठिकाणी लिकेज असेल तर अशुद्ध पाणी येत असेल एवढ्यापर्यंतच आपली कल्पना. पण, वास्तव अतिशय वेगळे आहे. चक्क मलमूत्राच्या गटाराचे पाणी नळाद्वारे येवू शकते यावर विश्वास बसणार नाही, पण ते सत्य आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य टाकीभोवती असलेले वॉल गटाराच्या विळख्यात आहे. प्राधिकरणाकडून शुद्ध पाणी पुरवठ्याचा दावा केला जातो. मात्र नळातून अशुद्धच नव्हे तर दूषित पाणी आपल्या घरापर्यंत पोहोचत आहे.
यवतमाळ शहराला सुमारे ३० हजार नळ जोडण्यांद्वारे पाणीपुरवठा केला जातो. चार लाखांवर नागरिक या पाण्याचा वापर करतात. प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचण्यासाठी गोदणी रोडवरील टाकीजवळ वेगवेगळ्या ठिकाणी पाच वॉल आहेत. सदर वॉल उघडताच टप्प्या टप्प्याने विविध भागात पाणी पोहोचते. मात्र ज्या ठिकाणी हे वॉल आहेत, तो संपूर्ण भाग घाण पाण्याने व्यापलेला आहे. एवढेच काय तर काही वॉल असलेले टाके पूर्णपणे भरलेले आहे.
नागरी ग्रामीण योजनेच्या इमारतीत असलेल्या प्रसाधनगृहाचे पाईप फुटलेले आहेत. यातील सर्व घाण पाणी वॉल असलेल्या ठिकाणी जमा होत आहे. जवळपास दोन हजार चौरस फुटाचा परिसर मलमूत्राच्या पाण्याने व्यापून टाकला आहे. ही परिस्थिती गेली काही महिन्यांपासून निर्माण झाली आहे. एवढेच नव्हे तर प्राधिकरणाचे कर्मचारी नाकाला रूमाल लावून कार्यालयात काम करतात. नाक दाबल्यानंतर तोंड उघडले जाते असे म्हणतात, मात्र या कार्यालयाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे तोंड नाक दाबूनही उघडत नाही. काही कर्मचाऱ्यांनी हे गंभीर वास्तव अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिले. मात्र मिनरल वॉटर सेवन करणाऱ्या या अधिकाऱ्यांना लोकांच्या आरोग्याविषयी कधी काळजी घेण्याची गरज वाटली नाही.
प्राधिकरण तसा ‘मुर्दाड’ विभाग म्हणून नावारूपास आला आहे. लोकांच्या तक्रारींची काहीएक देणे-घेणे नाही. अधिकारी आपल्या तोऱ्यात वागतात. मुख्यालयी राहणे त्यांच्या पचनीच पडत नाही. कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या भरवशावर तीन लाख लोकांच्या ‘जीवनाचा’ प्रश्न रेटला जात आहे. मुख्य पाण्याची टाकी, दर्डानगर, वाघापूर नाका, पिंपळगाव या भागात असलेल्या पाण्याच्या टाक्या कधी स्वच्छ केल्या जात नाही. फिल्टरवरून आलेले पाणी टाकीत घेवून सोडणे एवढेच आपले काम असल्याचे ते मानतात. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निळोणा धरणात गाळ साचला आहे. प्रयास संस्था लोकसहभागातून गाळ काढण्याचा प्रयत्न करीत आहे. एकीकडे गाळ काढून साठवण क्षमता वाढविण्यासाठी नागरिक प्रयत्न करीत असताना दुसरीकडे जीवन प्राधिकरण मात्र शुद्ध पाण्यासाठीही प्रयत्न करताना दिसत नाही.