रानडुकरांची वनखात्यालाही डोकेदुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 00:16 IST2019-01-12T00:15:02+5:302019-01-12T00:16:58+5:30
झुडपी जंगल आणि वेकोलिच्या खाणी, यामुळे लपण्यासाठी पुरेशी सुरक्षित जागा असल्याने या भागात रानडुकरांची संख्या झपाट्याने वाढत आहे. याचा सर्वाधिक उपद्रव शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. सोबतच डुकरांची वाढती संख्या वनविभागासाठीदेखिल मनस्ताप देणारी ठरत आहे.

रानडुकरांची वनखात्यालाही डोकेदुखी
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : झुडपी जंगल आणि वेकोलिच्या खाणी, यामुळे लपण्यासाठी पुरेशी सुरक्षित जागा असल्याने या भागात रानडुकरांची संख्या झपाट्याने वाढत आहे. याचा सर्वाधिक उपद्रव शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. सोबतच डुकरांची वाढती संख्या वनविभागासाठीदेखिल मनस्ताप देणारी ठरत आहे.
कायद्याच्या किचकट प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांना रानडुकरांचा बंदोबस्त करता येत नाही. रानडुकरांना शूट करण्याचे आदेश देण्याचा अधिकार केवळ आरएफओला आहे. परवानगी न घेता डुकराला ठार मारल्यास शेतकऱ्यांना कारवाईला सामोरे जावे लागते. परवानगी घेतल्यानंतरही शस्त्र परवानाधारकाकडूनच रानडुकरांना ठार मारता येते. तत्पूर्वी रानडुकरांमुळे होणोर नुकसान शेतकऱ्यांना वनविभागापुढे सिद्ध करावे लागते. या साऱ्या प्रक्रियेनंतर वनविभाग रानडुकरांना ठार मारण्याची परवानगी बहाल करतो.
अलीकडे वणी परिसरात रानडुकरांची संख्या झपाट्याने वाढत असून शेतपिकांमध्ये या रानडुकरांचा प्रचंड धुमाकूळ सुरू आहे. सध्या तुरीची कापणी सुरू असून रात्रीच्यावेळी रानडुकरांचे कळप शेतात शिरून तुरीच्या गंजी उद्ध्वस्त करित आहे. खाणे कमी आणि नुकसानच जास्त, असा प्रकार सुरू आहे. यामुळे शेतकरी कमालीचे वैतागले आहे. रानडुकरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकºयांकडून सातत्याने केली जाते. पण वनविभागाच्या पातळीवर कोणतीही कारवाई केली जात नाही. रानडुकरांचा बंदोबस्त शेतकऱ्यांनी परवानगी घेऊन स्वबळावर करावा, असा कायदा म्हणतो.
रानडुक्कर हे शेड्युल्ड तीनमध्ये येतात. त्यामुळे कायद्याने रानडुकरांना संरक्षण दिले आहे. जास्तच उपद्रव होत असेल, तर वनविभागाने रानडुकरांना ठार मारण्याची परवानगी देतो. शेतकरी आपापल्या पातळीवर रानडुकरांचा बंदोबस्त करतात. पिकाच्या सभोवताल छोटेखानी ताराचे कुंपण करून त्यात बॅटरीद्वारे करंट सोडला जातो. मात्र अलिकडे या उपाययोजनेलाही रानडुकरे जुमानत नसल्याचे चित्र दिसत आहे. या कुंपणाची उंची कमी राहत असल्याने रानडुकरांची पिले ताराखालून तर मोठी डुकरे तारांवर उडी मारून शेतात शिरतात. अनेक शेतकरी थिमेटचाही वापर करतात. मात्र सरावलेली ही रानडुकरे थिमेटकडेही दुर्लक्ष करून पिकांचे नुकसान करित आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.
आठ वर्षांपूर्वी आणला होता हैदराबादवरून शूटर
वणी परिसरातील रानडुकरांची संख्या लक्षात घेता, आठ वर्षांपूर्वी या डुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी हैदराबादवरून शार्प शूटर आणण्यात आला होता. काही दिवस या शुटरने रानडुकरांना मारलेही. मात्र डुकरांची संख्या पाहून वैतागलेला हा शार्प शूटर काही दिवसातच परत गेला.