पोलिसांवरील हल्ल्याच्या विरोधात मोर्चा
By Admin | Updated: September 30, 2016 02:57 IST2016-09-30T02:57:16+5:302016-09-30T02:57:16+5:30
अधिक श्रम करूनही अल्पवेतनावर नागरिकांची सुरक्षा करणाऱ्या पोलिसांवर अलिकडे हल्ले करण्यात येत आहेत.

पोलिसांवरील हल्ल्याच्या विरोधात मोर्चा
कुटुंबांचा सहभाग : तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन
वणी : अधिक श्रम करूनही अल्पवेतनावर नागरिकांची सुरक्षा करणाऱ्या पोलिसांवर अलिकडे हल्ले करण्यात येत आहेत. याचा निषेध करण्यासोबतच पोलिसांच्या विविध समस्या सोडविण्याच्या मागणीसाठी गुरूवारी श्री गुरूदेव पोलीस व गृहरक्षक दल कुटुंब संरक्षण समितीच्यावतीने येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
स्थानिक जैताई मंदिरातून या मोर्चाला सुरूवात झाली. मोर्चात गृहरक्षक व पोलिसांचे कुुुंटुब मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हा मोर्चा टिळक चौक मार्गे तहसील कार्यालयावर पोहचला. तेथे तहसीलदार रविंद्र जोगी यांना निवेदन देण्यात आले.
पोलिसांवरील हल्ले थांबविण्यासाठी गंभीर स्वरूपाचा कायदा करण्यात यावा, पोलीस अनुकंपा भरती तात्काळ करण्यात यावी, पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी कर्तव्य बजावत असताना आजारी अथवा जखमी झाल्यास शासनाने तात्काळ वैद्यकीय व्यवस्था उपलब्ध करून देण्यात यावी, तसेच त्यांच्या कुटुंबालासुद्धा मोफत आरोग्य सेवा पुरविण्यात यावी, यासह विविध मागण्या निवेदनातून करण्यात आल्या.
या मोर्चाचे नेतृत्व मुख्य संयोजक दिलीप भोयर, मुख्य संघटक मिलिंद पाटी, मुख्य निमंत्रक होमदेव कनाके, दशरथ राजुरकर आदींनी केले. (कार्यालय प्रतिनिधी)