अजगरने वाघिणीच्या डोक्यात घातल्या गोळ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 21:12 IST2018-11-03T21:12:03+5:302018-11-03T21:12:38+5:30
राळेगाव परिसरातील बोराटीच्या जंगलातील कुबट अंधाराला भेदत वनविभागाचे पथक शार्पशुटरसह नरभक्षी वाघिणीचा ‘गेम’ करण्यासाठी पुढे सरसावताच, काही कळण्याच्या आत झुडूपात लपून बसलेल्या वाघिणीने पथकाच्या जिप्सीवर थेट हल्ला चढविला.

अजगरने वाघिणीच्या डोक्यात घातल्या गोळ्या
योगेश पडोळे / शेषराव राठोड ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरकवडा / मोहदा : राळेगाव परिसरातील बोराटीच्या जंगलातील कुबट अंधाराला भेदत वनविभागाचे पथक शार्पशुटरसह नरभक्षी वाघिणीचा ‘गेम’ करण्यासाठी पुढे सरसावताच, काही कळण्याच्या आत झुडूपात लपून बसलेल्या वाघिणीने पथकाच्या जिप्सीवर थेट हल्ला चढविला. चवताळलेली वाघिण पथकातील कर्मचाऱ्यांच्या नरडीचा घोट घेण्याच्या तयारीत असतानाच शार्पशुटर नवाब शहाफतअली खान याचा मुलगा अजगर अलीखान याने वाघिणीच्या डोक्यात गोळ्या घालून तिला ठार मारले अन् दिड महिन्यापासून सुरू असलेल्या टी-१ मोहिमेवर पडदा पडला.
शुक्रवारी राळेगावचा आठवडी बाजार असल्याने बोराटी येथील शेतकरी-शेतमजूर बाजारासाठी राळेगावकडे जात असताना अनेकांना या नरभक्षी वाघिणीने तिला या रस्त्यावर दर्शन दिले. त्यानंतर नागरिकांनी यासंदर्भात वन विभागाला याबाबतची माहिती दिली. त्यामुळे वन विभागाने तातडीने या भागात गस्त वाढविली. कॅमेरे लावण्यात आले. तिला ट्रॅन्क्युलाईझ करण्यासाठी उपाययोजनाही करण्यात आल्या आणि अखेर रात्री अकरा वाजताच्या सुमारास वन विभागाच्या पथकाच्या टप्प्यात ही वाघिण आली. काही कळायच्या आत झुडपातून तिने थेट जिप्सीवर अचानक धावा केला. यावेळी पथकातील शेख मुकबीर शेख या शूटरने तिच्यावर ट्रॅन्क्युलाईझ डॉट मारला. त्यामुळे वाघिण पुन्हा बिथरली. थेट सात-आठ मीटर समोर येऊन जीपवर उडी मारणार तोच अजगर अली याने तिच्या डोक्यात गोळ्या घालून तिला ठार मारले. त्यामुळे तीन तालुक्यातील भीतीचे वातावरण संपले.
बोराटीची सोनाबाई ठरली पहिली बळी
जून २०१६ मध्ये बोराटे या गावातील सोनाबाई भोसले या महिलेचा या वाघिणीने पहिला बळी घेतला होता. तेव्हापासून या वाघिणीचा धुमाकूळ सुरूच होता. दोन वर्षात या वाघिणीने १३ जणांचे बळी घेतले. या वाघिणीने पहिला बळी ज्या गावात घेतला, त्याच गावात तिचा बळी जाणार हे तिला ठाऊकही नव्हते. मात्र ज्या ठिकाणी तिने सोनाबाईचा जीव घेतला होता त्याच ठिकाणी तिलाही शिकार बनावे लागले.