‘आदर्श ग्रामसभा’चे थाटात प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 22:06 IST2018-02-15T22:06:11+5:302018-02-15T22:06:31+5:30
ग्रामपंचायतींच्या माध्यमातून गावविकासाला गती मिळावी, त्यासाठी गावकऱ्यांनीही आपल्या अधिकारांबाबत सजग व्हावे, या उद्देशाने ‘लोकमत’ने पुढाकार घेऊन ‘आदर्श ग्रामसभा’ ही उपयुक्त पुस्तिका तयार केली.

‘आदर्श ग्रामसभा’चे थाटात प्रकाशन
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : ग्रामपंचायतींच्या माध्यमातून गावविकासाला गती मिळावी, त्यासाठी गावकऱ्यांनीही आपल्या अधिकारांबाबत सजग व्हावे, या उद्देशाने ‘लोकमत’ने पुढाकार घेऊन ‘आदर्श ग्रामसभा’ ही उपयुक्त पुस्तिका तयार केली. बुधवारी खासदार भावना गवळी यांच्या हस्ते या पुस्तिकेचे थाटात प्रकाशन झाले.
‘लोकमत सरपंच अवार्ड’ वितरणाचा दिमाखदार सोहळा बुधवारी येथील हॉटेल स्टेप इनमध्ये पार पडला. यावेळी जिल्हाभरातील सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीत ‘आदर्श ग्रामसभा’ पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. खासदार भावना गवळी, यवतमाळच्या नगराध्यक्ष कांचनताई चौधरी, जिल्हा परिषदेच्या आरोग्य व शिक्षण सभापती नंदिनीताई दरणे, समाजकल्याण सभापती प्रज्ञाताई भूमकाळे, यशदाचे मानद व्याख्याता नवनाथ गायकवाड, लोकमत जिल्हा कार्यालय प्रमुख किशोर दर्डा, उपमहाव्यवस्थापक सुशांत दांडगे आदी मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती.
ग्रामसभेचे महत्त्व काय आहे, त्यात गावकऱ्यांचे अधिकार कोणते आहेत, ग्रामपंचायतीमार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजना कोणत्या, ग्रामपंचायत पदाधिकारी आणि सचिवांची कर्तव्ये कोणती आहेत, यासंबंधीची अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती या पुस्तिकेत संकलीत करण्यात आली आहे. नियोजनबद्ध आणि गतिमान ग्रामविकासाकरिता या पुस्तिकेचा प्रत्येकाला उपयोग होईल, असे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.