बाजारात शुकशुकाट : खरीप हंगामावरही दुष्काळाचे सावट लोकमत न्यूज नेटवर्क उमरखेड : खरीप हंगाम जवळ येवून ठेपला असताना मागील हंगामात उत्पादित मालालाच बाजारपेठेत योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त आहे. आतापर्यंत भाव वाढेल या आशेवर शेतकऱ्यांनी मालाची साठवण केली होती. पंरतु शासनाचे धोरण शेतकऱ्यांसाठी पोषक नसल्याने आणि त्यातच खरिपाची पेरणी करावी लागत असल्याने शेतकऱ्यांना नाईलाजास्तव मिळेल त्या भावात आपला माल विकावा लागत आहे. कापूस, सोयाबीन, तूर व अन्य पिकांना यावर्षी बऱ्यापैकी पोषक वातावरण लाभल्याने अनेकांना चांगले उत्पादन झाले. कधी पाऊस कमी तर कधी अधिक अशा वाईट परिस्थितीत कोपलेल्या निसर्गासोबतच तडजोड करीत चार वर्षे शेतकऱ्यांनी काढली. यावर्षीच्या हंगामाने बऱ्यापैकी साथ दिली असल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. परंतु मालाला बाजारात उठावच नसल्याने पुन्हा एकदा शेतकरी काळजीत पडला आहे. राज्य व केंद्र शासन शेतकऱ्यांपेक्षा इतर अनेक बाबींना प्राधान्य देत असल्याचे दिसून येते. त्यामुळे शेतकऱ्यांचे मनोबल कुठेतरी खच्ची होत आहे. बदल्या राजकीय समीकरणात शेतकऱ्यांची बाजू ठोसपणे मांडण्याचे धाडस कुणीही नेता अथवा पक्ष करीत नसल्याचे दिसून येते. प्रत्येकजण आपल्या सोयीची भूमिका घेत आहे. त्यामुळे आता कुणाकडे बघावे, असा प्रश्न बळीराजाला पडला आहे. मृग नक्षत्र आले असतानाही यावर्षी उकाडा व उष्णतेची लाट कायम आहे. तेव्हा खरिपाच्या पेरणीतून आवक होईल की नाही हा प्रश्न आहेच. बी-बियाणे आणि खते कशी खरेदी करावी ही काळजी शेतकऱ्यांना पडली आहे. त्यातच दुय्यम दर्जाचे बियाणे आणि खते बाजारात येवून पडली आहे. याचाही फटका सोसावा लागतो. शासनाकडून केवळ कारवाई करण्याचे चित्र उभे केले जाते. प्रत्यक्षात तसे होत नसल्याने शेतकऱ्यांना फसविणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.
शेतमालाला भाव नसल्याने अडचण
By admin | Updated: June 7, 2017 00:54 IST