गलथान कारभाराचा बळी... खांबावरून पडून खासगी लाईनमनचा मृत्यू
By विलास गावंडे | Updated: June 30, 2023 16:54 IST2023-06-30T16:50:53+5:302023-06-30T16:54:23+5:30
यवतमाळ जिल्ह्यातील घटना : नागरिकांनी वीज अभियंत्याला घेरले

गलथान कारभाराचा बळी... खांबावरून पडून खासगी लाईनमनचा मृत्यू
नेर (यवतमाळ) : लाईनचे काम करताना शॉक लागून वीज खांबावरून पडल्याने खासगी लाईनमनचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी नेर तालुक्यातील चिचगाव शिवारात घडली. सुरेश किसन ठाकूर (४६) रा.चिचगाव, असे मृताचे नाव आहे. दरम्यान, नागरिकांनी वीज अभियंता नितीन राऊत यांना घेराव घालून मदतीशिवाय मृतदेह उचलणार नाही, अशी भूमिका घेतली. तात्काळ २० हजार रुपये मदत करण्यात आली. पुढेही मदतीचे आश्वासन मिळाल्याने मृतदेह उचलण्यात आला.
सुरेश ठाकूर हे गुणवंत गावंडे यांच्या शेतातील खांबावर चढून काम करीत होते. शॉक लागून खाली पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. याची माहिती होताच गावकरी घटनास्थळी पोहोचले. गावात लाईनमन हजर राहात नसल्याने खासगी व्यक्तीकडून विजेची कामे करून घ्यावी लागतात. सुरेश ठाकूर हे वीज यंत्रणेतील गलथान कारभाराचा बळी ठरले. या भागात काही वीज कर्मचारी खासगी लाईनमनकडून धोक्याची कामे करून घेत असल्याची ओरड आहे.
नागरिकांचा रोष पाहता राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुनील खाडे, सामाजिक कार्यकर्ते विलास राठोड यांनी तत्काळ तहसीलदार डॉ.शिवाजी मगर यांच्याशी संपर्क केला. यानंतर घटनास्थळी विद्युत कंपनीचे सहाय्यक अभियंता नितीन पाटील पोहोचले. त्यांना मृताची विवाहित मुलगी तेजल पाठक व नागरिकांनी घेराव घातला. स्थानिक लाईनमन आपल्या वडिलांना विजेची कामे करायला सांगायचे. याचाच ते बळी ठरल्याचा आरोप करण्यात आला. मृत सुरेशच्या मागे पत्नी, पाच मुली व मोठा आप्त परिवार आहे.