लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : कोरोना रुग्ण कमी होत असल्याचे पाहून राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी १७ ऑगस्टपासून पहिली ते सातव्या वर्गाच्या शाळाही सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे यवतमाळ जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील प्राथमिक शाळाही सुरू होणार आहे. मात्र अद्याप राज्य शासनाच्या लेखी आदेशाची प्रतीक्षा असल्याचे शिक्षणाधिकारी प्रमोद सूर्यवंशी यांनी सांगितले. जिल्ह्यात १५ जुलैपासून शहरी क्षेत्र वगळता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहे. आता पहिली ते सातवीचे वर्गही सुरू करण्याची तयारी केली जात आहे. मात्र शहरी क्षेत्रातील शाळांबाबत अद्यापही शिक्षण विभागातून ठोस निर्णय होताना दिसत नाही. त्यामुळे पालकांमध्ये अस्वस्थता आहे.
पालकांना मुलांच्या आरोग्याची चिंता
शाळा सुरू झाली तर मी माझ्या मुलीला शाळेत पाठवायला तयार आहे. तसे संमतीपत्रही यापूर्वीच शाळेला दिले आहे. माझी मुलगी जिल्हा परिषद शाळेत आठव्या वर्गात आहे. तिलाही प्रत्यक्ष शाळेत जाण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे. शाळा सुरू व्हावी. - साधना उरकुडे, पालक
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुलाच्या आरोग्याची चिंता वाटतेच. पण आता कोरोना आपल्या जिल्ह्यात येऊन एक वर्षापेक्षा अधिक काळ झाला आहे. मग आणखी किती दिवस शिक्षण बंद ठेवायचे. मोबाईलवरच्या ऑनलाईन शिक्षणात मुलांना तेवढा रस नाही. प्राथमिक शाळा सुरू झाल्याच पाहिजे. - नीलेश डहाके, पालक