रुग्णवाहिकेतून पीपीई किट फेकल्या, चालकाचा बेजबाबदारपणा, गावक-यांनी हटकले
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2020 20:42 IST2020-08-01T20:41:58+5:302020-08-01T20:42:17+5:30
ही बाब गावक-यांच्या लक्षात येताच त्यांनी चालकांना हटकले. त्यानंतर चालकांनी परत त्या किट घेऊन पुढील रस्ता धरला.

रुग्णवाहिकेतून पीपीई किट फेकल्या, चालकाचा बेजबाबदारपणा, गावक-यांनी हटकले
आर्णी (यवतमाळ) : नागपूर-बोरी- तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील शेलू फाट्याजवळ (ता. आर्णी) यवतमाळ येथून आलेल्या दोन रुग्णवाहिकेमधून काही पीपीई किट फेकण्यात आल्या. ही बाब गावक-यांच्या लक्षात येताच त्यांनी चालकांना हटकले. त्यानंतर चालकांनी परत त्या किट घेऊन पुढील रस्ता धरला.
यवतमाळ येथून दोन रुग्णवाहिका आर्णीकडे येत होत्या. शनिवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास शेलू फाटा ते तरोडा या गावांच्या मधोमध दोन्ही रुग्णवाहिका थांबल्या. त्यातील एका चालकाने रुग्णवाहिकेतून वापरलेली पीपीई किट काढून रस्त्यालगत फेकून दिली. तेथून त्यांनी पोबारा करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच दरम्यान मांगरुळ येथील गजानन रघुनाथ फुलकर हे मित्रासह तेथे पोहोचले. त्यांनी रुग्णवाहिका चालकांना बेजबाबदारपणे वागण्याबद्दल जाब विचारला. गोंधळलेल्या रुग्णवाहिका चालक व कर्मचा-यांनी गजानन फुलकर व त्यांच्या मित्रांसोबत वाद घातला.
मात्र अखेर चालक व कर्मचा-यांनी वापरलेली किट तेथून उचलून पोबारा केला. वापरलेल्या किट व मास्कची अशा पद्धतीने बेजबाबदारपणे विल्हेवाट लावली जात असल्याचे यातून दिसून आले. आरोग्य विभागाने कोरोना रुग्णांवरील उपचारादरम्यान वापरलेल्या किट व इतर साहित्याची विल्हेवाट लावण्यासाठी योग्य पद्धत अवलंबण्याची गरज निर्माण झाली आहे.