प्रदूषण न होता कमी खर्चात होणार वीज निर्मिती! यवतमाळच्या तरुणाचा प्रयोग यशस्वी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 15:15 IST2021-05-13T15:12:43+5:302021-05-13T15:15:33+5:30
Yawatmal news यवतमाळच्या तरुणाने प्रदूषण विरहित आणि अत्यल्प खर्चात वीज निर्मितीचा प्रयोग यशस्वी केला आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पाचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पेटेंट मिळविणारा तो महाराष्ट्रातील सर्वात कमी वयाचा शास्त्रज्ञही ठरला आहे.

प्रदूषण न होता कमी खर्चात होणार वीज निर्मिती! यवतमाळच्या तरुणाचा प्रयोग यशस्वी
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : वीज ही आज प्रत्येकाची गरज बनली आहे. मात्र वीज निर्मिती प्रकल्पातून होणारे प्रचंड प्रदूषण हा चिंतेचा विषय झाला आहे. त्यावर मात करीत यवतमाळच्या तरुणाने प्रदूषण विरहित आणि अत्यल्प खर्चात वीज निर्मितीचा प्रयोग यशस्वी केला आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पाचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पेटेंट मिळविणारा तो महाराष्ट्रातील सर्वात कमी वयाचा शास्त्रज्ञही ठरला आहे.
यवतमाळच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणाऱ्या या तरुणाचे नाव आहे रितीक आनंद अमरावत. रितीक फक्त २० वर्षे वयाचा आहे. मात्र या अत्यल्प वयात त्याने आपल्या प्रयोगाद्वारे सर्वांनाच चकित केले आहे. प्रदूषण न होता वीज निर्मिती करता येते, ही गोष्ट त्याने शक्य करवून दाखविली आहे.
त्याच्या प्रोजेक्टचे नाव को-जनरेशन पावर प्लांट प्रोजेक्ट असे आहे. त्याने सोलर पावर स्ट्रीम व ॲसिटीलीन गॅसपासून वीज निर्मिती करून दाखविली आहे. ही विज निर्मिती करताना कसल्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही. हीच बाब या प्रयोगाची जमेची बाजू असल्याचे बोलल्या जाते. या वीज निर्मितीचे पेटेंट भारत व ऑस्ट्रेलिया या दोन्ही देशात झालेले आहे. अशा प्रकारचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पेटेंट घेणारा तो सर्वात कमी वयाचा शास्त्रज्ञ ठरला आहे. त्याला या प्रकल्पामध्ये यवतमाळचेच सुपूत्र शास्त्रज्ञ अजिंक्य कोट्टावार यांचे मार्गदर्शन मिळाले. त्याचप्रमाणे त्याला अमरावती विद्यापीठाचे मेंबर ऑफ बोर्ड, इनोव्हेशन डाॅ. राजेशकुमार सांभे यांनीही मार्गदर्शन केले.
या पेटेंटसाठी काही लाखांचा खर्च होणार होता. परिस्थिती सामान्य असल्यामुळे इतकी रक्कम कोठून आणावी हा मोठा यक्ष प्रश्न त्याच्यासोर होता. तरीही त्याने हिंमत सोडली नाही. त्याने उत्तर भारतीय आघाडीचे जिल्हाध्यक्ष राकेश मिश्रा यांना याबाबत विनंती केली. त्यांनी रितीकला माजी मंत्री व विद्यमान आमदार मदन येरावार यांच्याकडे नेले. येरावार यांनी मदत केल्यामुळे हे पेटेंट आपल्याला मिळू शकले, अशी माहिती स्वत: रितीकने दिली.
को- जनरेशन पावर प्लांटला वर्कींग मॉडेल बनवून तयार केले आहे. या मॉडेलमधून प्रदूषण न होता कमी पैशात वीज निर्मिती करता येते.
- रितीक अमरावत, यवतमाळ