पोस्टाच्या पैशांवर डल्ला ; दुचाकीसह सात लाखांची लूट

By सुरेंद्र राऊत | Updated: May 13, 2025 18:41 IST2025-05-13T18:40:42+5:302025-05-13T18:41:10+5:30

करळगावा घाटातील घटना : चाकूचा धाक लावून दुचाकीच हिसकावली

Postal money stolen; Two-wheeler and Rs. 7 lakh looted | पोस्टाच्या पैशांवर डल्ला ; दुचाकीसह सात लाखांची लूट

Postal money stolen; Two-wheeler and Rs. 7 lakh looted

सुरेंद्र राऊत
यवतमाळ : बाभुळगाव येथील पाेस्ट मास्तर नेहमी प्रमाणे पाेस्टाच्या मुख्य कार्यालयातून दैनंदिन व्यवहाराची राेख घेऊन निघाले. मंगळवारी सकाळी १०:४५ वाजण्याच्या सुमारास धामणगाव मार्गावर करळगाव घाटात अज्ञात दुचाकीस्वारांनी त्यांना रस्त्यात अडवून चाकूचा धाक दाखविला. झटापट करून पाेस्ट मास्तरच्या दुचाकीची चावी घेऊन सात लाख राेख असलेली दुचाकी घेऊन पसार झाले. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

सुभाष नारायण बारसे रा.एकवीरा चाैक दारव्हा राेड यवतमाळ हे नेहमी बाभुळगाव येथे ये-जा करत हाेते. मंगळवारी सकाळी नेहमी प्रमाणे ते दुचाकी क्र. एमएच २९ एझेड ५३३० ने पाेस्टाच्या मुख्य कार्यालयात आले. त्यांनी तेथून सात लाख रुपये राेख काढली. बाभुळगाव पाेस्टात दैनंदिन व्यवहार करण्यासाठी ही राेख त्यांनी साेबत घेतली. पैसे दुचाकीच्या डक्कीत ठेवून ते बाभुळगावकडे निघाले. करळगाव घाटाजवळ स्टाेन क्रशर परिसरात अचानक हाेंडा शाइन दुचाकीवरून आलेल्या दाेघांनी बारसे यांची दुचाकी थांबवली. काय झाले असे विचारत असतानाच, एकाने धारदार चाकू काढून बारसे यांच्या पाेटाला लावला. त्यांच्याकडून जबरदस्तीने दुचाकीची चावी हिसकावून घेत, त्यांची दुचाकी घेऊन ते दाेघे पुढे निघून गेले. घाबरलेल्या बारसे यांनी आरडाओरडा करून मदतीची मागणी केली, परंतु त्यांना रस्त्यात काेणत्याच वाहनधारकाने मदत केली नाही. अखेर त्यांनी याची माहिती पाेस्ट कार्यालयात दिली. त्यानंतर, पाेलिस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक गुन्हे शाखा पथक, शहर पाेलिस घटनास्थळी पाेहाेचले. त्यांनी आराेपींचा काही सुगावा लागताे का, याचा तपास हाती घेतला. या प्रकरणी सुभाष बारसे यांच्या तक्रारीवरून शहर पाेलिसांनी अज्ञात दाेघांविराेधात वाटमारीचा गुन्हा दाखल केला आहे.


पाळत ठेवून केला गुन्हा

पाेस्ट ऑफिस, बॅक परिसरात पाळत ठेवून लुटणारी टाेळी सक्रिय आहे. याच टाेळीच्या सदस्यांनी हा गुन्हा केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. आराेपी संपूर्ण चेहरा बांधून असल्याने केवळ त्याच्या शरीराच्या ठेवणीवरून रेकाॅर्डवरील आराेपींची झडती घेतली जात आहे.


सीसीटीव्ही फुटेजच एकमेव पर्याय

पाेस्टाच्या मुख्य कार्यालयापासून घटनास्थळापर्यंत काेणी पाठलाग केला, याची पडताळणी केली जात आहे. यासाठी रस्त्यावरच्या दुकानांतील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी पाेलिसांकडून करण्यात येत आहे. हा एकमेव पर्याय सध्या पाेलिसांपुढे उपलब्ध आहे. गुन्हा करण्याच्या पद्धतीवरून आराेपी सराईत असल्याचे सांगण्यात येत आहे.

Web Title: Postal money stolen; Two-wheeler and Rs. 7 lakh looted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.