औषध निर्माता कंपन्यांकडून रुग्णांच्या आरोग्याशी खेळ ! सरकारी रुग्णालयांना बोगस औषधांचा पुरवठा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 12:44 IST2025-11-04T12:40:30+5:302025-11-04T12:44:33+5:30
रुग्णांच्या आरोग्याशी खेळ : नमुन्याची प्रयोगशाळेतून झाली तपासणी

Pharmaceutical companies playing with patients' health! Supply of bogus medicines to government hospitals
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : औषध निर्माता कंपन्यांकडून रुग्णांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. काही कंपन्यांकडून सरकारी रुग्णालयांना बोगस, तर काही कंपन्यांकडून अप्रमाणित औषधांचा पुरवठा केला जात आहे. असाच प्रकार 'सिंडिकेट फार्मा' या कंपनीने केला आहे. या कंपनीने एका सरकारी रुग्णालयाला पुरविलेली औषधी अप्रमाणित असल्याचे स्पष्ट झाले आहे. या कंपनीने पुरविलेल्या औषधीचा वापर त्वरित थांबविण्यात यावा, असे आदेश आरोग्यसेवा सहसंचालक (खरेदी कक्ष) यांनी दिले आहेत.
औषध कंपन्यांकडून पुरविण्यात आलेल्या औषधीचे आरोग्य संस्थांकडून नमुने घेतले जातात. त्याची प्रयोगशाळेत तपासणी करण्यात येते. अशाच प्रकारचा नमुना बुलडाणा जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या औषध भांडारातून घेण्यात आला. तपासणी करण्यासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आलेला हा नमुना अप्रमाणित असल्याचा अहवाल देण्यात आला आहे.
सर्व सरकारी रुग्णालयांना केले अलर्ट
सिंडिकेट फार्मा कंपनीने पुरविलेल्या संबंधित बॅचचे ओरल रिहायड्रेशन सॉल्ट पावडर अप्रमाणित असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयांतर्गत जिल्हा रुग्णालय, जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकाऱ्यांना कळविण्यात आले आहे.
अलीकडे बोगस औषधांचा होत असलेला पुरवठा पाहता यंत्रणेकडून औषध वापराबाबत खबरदारी घेतली जात आहे. घेतलेल्या नमुन्याची तातडीने तपासणी करण्यात येत आहे. यामध्ये काही नमुने अप्रमाणित येत आहेत. कंपन्यांनी रुग्णांच्या आरोग्याशी सुरू केलेला हा खेळ तातडीच्या कारवाईमुळे थांबण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
ओरल रिहायड्रेशन सॉल्ट पावडर
- सिंडिकेट फार्मा कंपनीने ऑगस्ट २०२५ मध्ये उत्पादित केलेले ओरल रिहायड्रेशन सॉल्ट पावडर बुलडाणाच्या औषध भांडाराला पुरविले होते.
 - या औषधीचा रुग्णांवर वापरही सुरू झाला होता. तपासणीसाठी नमुना घेण्यात आल्याने पोलखोल झाली. सोफिस्टिकेटेड इंडस्ट्रिअल मटेरिअल अॅनालिटिकल लॅब प्रा.लि. यांच्याकडून या औषधाचा अहवाल प्राप्त झाला आहे.
 - ८२५१२३२ या बॅचची ही औषधी 3 आहे. रुग्णालयांनी या औषधांचा वापर आणि वितरण तातडीने थांबवावे, असे आरोग्यसेवा सहसंचालक डॉ. उमेश शिरोडकर यांनी म्हटले आहे.