पोलिसांना दिवाळीपूर्वी वेतन, भत्त्यांचा लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 21:48 IST2018-10-25T21:47:16+5:302018-10-25T21:48:01+5:30
पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिवाळीत कुठलीही आर्थिक अडचण भासू नये यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी विशेष तसदी घेतली आहे. वेतनासह सर्व भत्ते ३० आॅक्टोबरच्यापूर्वीच अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा व्हावे असे प्रयत्न केले जात आहे.

पोलिसांना दिवाळीपूर्वी वेतन, भत्त्यांचा लाभ
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिवाळीत कुठलीही आर्थिक अडचण भासू नये यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी विशेष तसदी घेतली आहे. वेतनासह सर्व भत्ते ३० आॅक्टोबरच्यापूर्वीच अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा व्हावे असे प्रयत्न केले जात आहे. दिवाळीचा सण पोलीस कुटुंबांना उत्साहाने साजरा करता यावा हाच या मागे उद्देश आहे.
सण-उत्सवाच्या काळात पोलीस अधिकारी-कर्मचारी आपल्या कुटुंबात वेळ घालवू शकत नाही. सामाजिक शांतता कायम राखण्यासाठी त्यांना दिवसरात्र रस्त्यावर रहावे लागते. किमान दिवाळीचा सण हा कुटुंबाला तरी चांगल्या पद्धतीने साजरा करता यावा, त्यांच्यापुढे कुठलीही आर्थिक अडचण येऊ नये याकरिता आॅक्टोबर महिन्याचे वेतन, दिवाळी सण अग्रीमचे १२ हजार ५०० रुपये, १५ दिवसाच्या रजा रोखीकरण, गणवेश भत्ता, पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी २४ आॅक्टोबरला याबाबत बिनतारी संदेश द्वारे सर्व ठाणेदार व सर्व शाखा प्रमुखांना आदेश दिले आहे. या निर्णयामुळे पोलीस वर्गात आनंदाचे वातावरण आहे. कर्मचाºयांची निकड लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
अग्रीम, गणवेश भत्ता आणि वेतन एकाच वेळी
यावेळेसची दिवाळी ७ नोव्हेंबरलाच आली आहे. पहिलाच आठवडा असल्याने नियमित वेतन होणार की नाही याची शाश्वती नाही. ही अडचण ओळखून ३० आॅक्टोबरलाच वेतन व भत्ते देण्याचा निर्णय घेतला. रजा रोखीकरणासह दिवाळी अग्रीम, गणवेश भत्ता आणि नियमित वेतन एकाच वेळी येणार असल्याने सण-उत्सवाच्या आनंदात भरच पडली आहे. सतत कर्तव्यावर धावपळ करणाऱ्या पोलीस कर्मचाºयांसाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी ही दिलासादायक बाब ठरली आहे.