पोषण आहाराला ब्रँडेड कंपनीचे पॅकिंग
By Admin | Updated: March 22, 2015 02:02 IST2015-03-22T02:02:19+5:302015-03-22T02:02:19+5:30
शालेय पोषण आहाराचा तांदूळ असलेल्या पोत्याला कोणताही धक्का न लावता पद्धतशीर तांदूळ काढला जातो.

पोषण आहाराला ब्रँडेड कंपनीचे पॅकिंग
यवतमाळ : शालेय पोषण आहाराचा तांदूळ असलेल्या पोत्याला कोणताही धक्का न लावता पद्धतशीर तांदूळ काढला जातो. दुसऱ्या पोत्यात तांदूळ भरून काळ््या बाजारात विक्री होते, यावर विश्वास बसत नाही ना ? मात्र हे सत्य आहे. यवतमाळात एका धान्य गोदामावर पोलिसांनी धाड मारली, तेव्हा पोत्यातून तांदूळ काढण्याची पद्धत पाहून पोलीसही अचंबित झाले. चिमुकल्यांच्या तोंडचा घास पळविणारे आता पोलिसांच्या तावडीत सापडले आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दिला जातो. त्यासाठी शासनाच्यावतीने तांदूळ आणि इतर साहित्याचा पुरवठा केला जातो. या पुरवठ्याचे कंत्राट यवतमाळातील हर्षद बेग यांना देण्यात आला आहे. त्यांनी धान्य माल साठविण्यासाठी पांढरकवडा मार्गावर गोदाम भाड्याने घेतले आहे. याच गोदामातून तांदूळाला पाय फुटत असल्याचा प्रकार शनिवारी उघडकीस आला. घाटंजीला विक्रीसाठी जाणारा तांदूळ पोलिसांनी पकडला. वाहनचालक आणि व्यापाऱ्याने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी गोदामाची झडती घेतली, आणि या गोदामात सुरू असलेला प्रकार पाहून पोलीसही स्तब्ध झाले.
तांदूळाच्या पोत्याचे सील न तोडता प्लास्टिकच्या एका जम्बो नळीने त्यातून तांदूळ काढले जाते. तासाभरात ५० किलोच्या पोत्यातून १५ किलो तांदूळ बाहेर येतात. मात्र याचा कुणालाही थांगपत्ता लागत नाही. शासनाकडून आलेल्या विशिष्ट पोत्यातील तांदूळ साध्या पोत्यांमध्ये भरले जाते आणि ते सरळ काळ््या बाजारात विकले जाते. तर शाळेला १० ते १५ किलो धान्य काढलेले पोते पुरविले जाते. सुतळीपासून बनविलेल्या पोत्यावर तांदूळाचे वजन लिहिलेले असते. ५० किलो नेट वजनाचे हे पोते असते. मात्र शाळेत उतरविताना त्याचे वजन ३५ ते ४० किलो भरते परंतु पोते सीलबंद असल्याने कुणीही संशय घेत नाही. मुख्याध्यापकही ५० किलो वजनाचे पोते मिळाले असे लिहून देतात. तसेच शाळेत पोते उतरविताना पुरवठादाराचे खास माणसे घाईगडबडीत पोते उतरवून घेतात. मात्र या पोत्यात किती किलो धान्य आहे याचा थांगपत्ता लागत नाही.
चिमुकल्यांच्या तोंडचा घास पळविण्यात एकटा कंत्राटदारच गुंतला असेल असे नाही. यात मोठी साखळीही असू शकते. या साखळीचा शोध घेतल्यास बडे मासेही गळाला लागण्याची शक्यता आहे. (शहर वार्ताहर)
यंत्रणा बेसावध
जिल्हाभरातील विद्यार्थ्यांना वितरित होणोर पोषण आहाराचे धान्य कोणत्या गोदामात आहे, ते सुरक्षित आहे का, धान्य घेऊन जाणारे वाहन किती किलो धान्य घेऊन जाते. नोंदी प्रमाणे धान्य भरले जाते का याची गत चार वर्षात कधीही तपासणी झाली नाही. आणि याच बाबीचा फायदा पुरवठादाराने घेतला.
गावाबाहेर गोदाम
शालेय पोषण आहाराचा तांदूळ ठेवण्यासाठी पुरवठादाराने खास गावाबाहेरचे गोदाम निवडले आहे. येथील पांढरकवडा परिसरात विरळ वस्तीत असलेल्या गोदामात धान्याची रिफिलिंग गेली जाते. मात्र कुणालाही त्याचा थांगपत्ता लागत नाही. तसेच गोदामातून साठा रजिस्टरच बेपत्ता आहे.
सर्वच अनभिज्ञ
विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणारे धान्य शाळा व्यवस्थापन समितीच्या उपस्थितीत उतरवून घेणे आवश्यक असते. परंतु या बाबीपासूनच शाळा व्यवस्थापन समिती अनभिज्ञ आहे. नेमके किती धान्य आले, पोते वजनाप्रमाणे होते काय याचा कुणालाही थांगपत्ता लागत नसल्याचे दिसते.