Outbreak of bollworm in Wani sub-division | वणी उपविभागात बोंडअळीचा उद्रेक

वणी उपविभागात बोंडअळीचा उद्रेक

ठळक मुद्देसोयाबीनची झाली माती : यंदाचा हंगाम शेतकऱ्यांसाठी ठरतोय मारक, पीक वाचविण्यासाठी केली जातेय धडपड

लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : गेल्या अनेक वर्षात पहिल्यांदाच वणी उपविभागातील शेतकरी संकटात सापडला आहे. अती पावसाने सोयाबीनची माती झाली. आता कापसावरही बोंडअळीने आक्रमण केल्याने शेतकरी कमालिचा हतबल झाला आहे. यंदा हे दोनही नगदी पीक शेतकऱ्यांच्या हातून जाण्याची भीती व्यक्त होत आहे.
वणी तालुक्यासह मारेगाव, झरी तालुक्यात बोंडअळीने दस्तक दिली आहे. गेल्या काही वर्षांपासून सातत्याने कपाशीवर बोंडअळीचा हल्ला होत आहे. यंदा मात्र त्याचे स्वरूप अतिशय तीव्र आहे. त्यामुळे जो कापूस फुटून आहे, तेवढाच कापूस शेतकऱ्यांच्या हाती येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. उर्वरित कापसाची बोंडे गुलाबी अळ्या पोखरत आहे. निसर्गाच्या या संकटाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहेत. यावर्षी परतीच्या पावसाने विलंब केला.
ऐन सोयाबीनला शेंगा फुटण्याच्यावेळी पावसाला आरंभ झाला. हा पाऊस पुढे अनेक दिवस कायम होता. परिणामी शेंगात दाणे भरल्यानंतर या पावसामुळे दाण्यांना अंकुर फुटले. सोयाबीनने रंग बदलला. ज्या शेतात एकरी १० क्विंटल सोयाबीनचे उत्पन्न होेणे अपेक्षित होते. त्या शेतात एकरी ८० किलो ते एक क्विंटलपर्यंत सोयाबीनचे उत्पन्न शेतकऱ्यांच्या हाती पडले. कर्ज काढून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला. कापूस विकून कर्जाची परतफेड करू, अशी स्वप्ने पाहणाऱ्या शेतकऱ्यांची मात्र बोंडअळीने निराशा केली. परतीच्या पावसाने अनेक शेतातील फुटलेला कापूस ओला झाला. ओला कापूस बाजारात नेऊन विकताना व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची अक्षरश: लुट सुरू केली. शेतकऱ्यांची सध्या तरी केवळ एकच वेचाई झाली आहे. उर्वरित प्रत्येक बोंडात गुलाबी बोंडअळीने शिरकाव केला. ह्या अळ्या आता कापसाची बोंडे पोरखत आहे. या अळ्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी शेतकर प्रयत्न करित असले तरी त्यात फार यश येत नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या आहेत. गेल्या अनेक वर्षात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात बोंडअळीने हल्ला केल्याचे शेतकरी सांगतात. यामुळे यंदा कापूस उत्पादनातही घट येण्याची शक्यता आहे.

मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या
एकीकडे सोयाबीनचे पीक शेतातच सडले. दुसरीकडे कापूस पिकावर बोंडअळीने हल्ला केला. जो कापूस निघाला, तो वेचण्यासाठीही मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांपुढे अडचणी वाढल्या आहे. दरवर्षी वणी, झरी व मारेगाव या तालुक्यांमध्ये चंद्रपूर, नांदेड व अन्य जिल्ह्यातून मजूर हंगामासाठी येतात. परंतु यावर्षी कोरोनामुळे मजुरांनी या भागात पाठ फिरविली आहे. परिणामी स्थानिक मजुरांचे भाव वधारले असून विनंत्या, आर्जव करूनही स्थानिक मजूर काम करण्यासाठी शेतात येत नसल्याचे शेतकरी सांगतात.

Web Title: Outbreak of bollworm in Wani sub-division

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.