पहूर पशुचिकित्सालयात कालबाह्य औषधसाठा

By Admin | Updated: June 13, 2016 00:58 IST2016-06-13T00:58:24+5:302016-06-13T00:58:24+5:30

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पूरक व्यवसाय म्हणून पशूधन पाळण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे.

Out-of-date medicines in the veterinary veterinary department | पहूर पशुचिकित्सालयात कालबाह्य औषधसाठा

पहूर पशुचिकित्सालयात कालबाह्य औषधसाठा

आरोग्याशी खेळ : जिल्हा परिषद अध्यक्षांच्या आकस्मिक भेटीतील वास्तव
यवतमाळ : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पूरक व्यवसाय म्हणून पशूधन पाळण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. त्याकरिता पशुवैद्यकीय दवाखान्यांना लाखो रुपये खर्च करून सक्षम बनविले जात आहे. मात्र वास्तव अतिशय भयावह असल्याचे दिसून येते. जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. आरती फुपाटे यांनी बाभूळगाव तालुक्यातील पहूर पशू वैद्यकीय दवाखान्याला भेट दिली असता तेथे चक्क २०१२ मध्ये मुदत संपलेली औषधी आढळून आली.
बाभूळगाव तालुक्याच्या दौऱ्यावर असताना जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. आरती फुपाटे यांनी गुरूवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास पहूर येथील पशू वैद्यकीय दवाखाना श्रेणी क्रमांक एक येथे भेट दिली. त्यावेळी दवाखान्याला कुलूप लागलेले होते. जिल्हा परिषद अध्यक्ष आल्याची माहिती मिळाल्यानंतर येथील शिपाई धावपळ करत अर्ध्या तासांनी दवाखान्यात पोहोचला. तोपर्यंत अध्यक्ष बाहेरच उभ्या होत्या. दवाखाना उघडल्यानंतर त्यांनी प्रथम ओपीडी रजिस्टर आणि औषधीसाठा तपासला. त्यामध्ये अतिशय धक्कादायक वास्तव पुढे आले. २० एप्रिलपासून या दवाखान्यात एकही जनावराला तपासण्यात आले नाही. औषधाची स्थिती तर अतिशय भयानक होती. २०१२, २०१४ आणि २०१५ या वर्षांमध्ये कालबाह्य ठरलेल्या औषधी ओपीडीत ठेऊन होत्या. अतिशय बेजबाबदारपणे येथील पशू संवर्धन अधिकारी वागत असल्याचे प्रत्यक्ष डॉ. फुपाटे यांना पहायला मिळाले. त्यांनी याची गंभीर दखल घेऊन तात्काळ बेजबाबदार पशू संवर्धन अधिकाऱ्यावर कारवाई करावी असे निर्देश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले.
ग्रामीण भागातील पशू वैद्यकीय दवाखाने असो किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे वैद्यकीय अधिकारी फिरकतच नाही. ग्रामीण विकासासाठी केंद्र व राज्य शासनाकडून अनेक योजना आखल्या जातात. त्या राबविणारी यंत्रणा मात्र गावात येतच नाही. त्यामुळे योजनांवर कोट्यवधीचा खर्च होऊनही त्याचे सकारात्मक परिणाम दिसत नाही. गावपातळीवर काम करणारा अधिकारी, कर्मचारी वर्ग कधीच मुख्यालयी हजर रहात नाही. याचा प्रत्यक्ष अनुभव येऊनही लोकप्रतिनिधीसुद्धा केवळ निलंबन आणि कारवाईच्या निर्देशा व्यतिरिक्त काहीच करू शकत नाही. शासनस्तरावरूनच या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी कठोर पावले उचलण्याची गरज आहे. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Out-of-date medicines in the veterinary veterinary department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.