विदर्भातील एकमेव महालक्ष्मी माता मंदिर; तब्बल २०३ वर्षांचा आहे इतिहास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2021 16:02 IST2021-10-14T15:56:16+5:302021-10-14T16:02:27+5:30

महाराष्ट्रात महालक्ष्मीची तीन प्रसिद्ध मंदिरे आहेत. मुंबई, कोल्हापूर आणि तिसरे विदर्भातील एकमेव असलेले देऊळगाव येथील मंदिर आहे. या मंदिराला तब्बल २०३ वर्षांचा इतिहास असून दरवर्षी महालक्ष्मी व नवरात्रात देवीचा उत्सव परंपरेप्रमाणे साजरा केला जातो. (Navratri)

The only one in Vidarbha | विदर्भातील एकमेव महालक्ष्मी माता मंदिर; तब्बल २०३ वर्षांचा आहे इतिहास!

विदर्भातील एकमेव महालक्ष्मी माता मंदिर; तब्बल २०३ वर्षांचा आहे इतिहास!

ठळक मुद्देनवरात्रात भाविकांची दर्शनासाठी गर्दी

मुकेश इंगोले

यवतमाळ : दारव्हा तालुक्यातील देऊळगाव (वळसा) येथील महालक्ष्मी माता मंदिराला तब्बल २०३ वर्षांचा इतिहास आहे. या ठिकाणी दरवर्षी महालक्ष्मी माता महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सध्या नवरात्रानिमित्त (navratri) दर्शनाकरिता भाविक मोठ्या संख्येने येत आहेत.

महाराष्ट्रात महालक्ष्मीची तीन प्रसिद्ध मंदिरे आहेत. मुंबई, कोल्हापूर आणि तिसरे विदर्भातील एकमेव असलेले देऊळगाव येथील मंदिर आहे. शहरापासून ६ किलोमीटर अंतरावर तरोडालगत देऊळगावस्थित महालक्ष्मीचे देवस्थान आहे. मंदिराच्या चोहोबाजूला उंच डोंगर मंदिराला जणू खडा पहारा देत आहे. डोंगरांच्या मधोमध व्यंग्राबरी व महालक्ष्मी मातेचे मंदिर सुंदर, शांत, निसर्गरम्य ठिकाणी वसलेले मंदिर आहे.

येथील तुळजाबाई रावजी राऊत या महिलेच्या अपार श्रद्धेमुळे १८१८ मध्ये व्यंग्राबरी व महालक्ष्मी माता प्रकट झाल्या, असे सांगितले जाते. पूर्वी घनदाट जंगलात टेकड्यांच्या मधोमध देवी विराजमान होत्या. या ठिकाणी तुळजाबाईंना पहिल्यांदा मातेचे दर्शन घडले. तेव्हापासून त्या दररोज येथे येऊन पूजा, अर्चना करायच्या. व्यंग्राबरी व महालक्ष्मी मातेचे तुळजाबाईला साक्षात दर्शन झाले. कालांतराने देवी डोंगरावर उभ्या राहिल्या. तेव्हापासून आजतागायत देवी त्याच ठिकाणी विराजमान आहे.

भाविकांची देवीवर अपार श्रद्धा आहे. गेल्या २०३ वर्षांपासून महालक्ष्मी व नवरात्रात देवीचा उत्सव परंपरेप्रमाणे साजरा केला जातो. अलिकडे येथे मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली. भाविकांकरिता विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. वन विभागातर्फे निसर्ग पर्यटन उद्यान तयार करण्यात आले. मध्यंतरी कोरोनामुळे बंद असलेले मंदिर घटस्थापनेपासून उघडण्यात आले. यावर्षी पूजेचे मानकरी गीता दिगंबर राऊत यांच्या हस्ते पूजा, विधी संपन्न झाली. नवरात्रात नऊ दिवस सकाळी व सायंकाळी संगीतमय महाआरती केली जाते. संस्थानचे विश्वस्त शंकर राऊत, धर्मदास राऊत, नानाभाऊ राऊत, राजू राठोड, चेतन राऊत नवरात्रात व्यवस्थेवर लक्ष ठेवून आहेत.

Web Title: The only one in Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.