२० लाखांच्या वृक्षतोडीत केवळ वनरक्षक निलंबित

By Admin | Updated: September 13, 2015 02:15 IST2015-09-13T02:15:54+5:302015-09-13T02:15:54+5:30

कृष्णापूर वनवर्तुळातील सुमारे २० लाख रुपयांच्या सागवान तोडीत केवळ एका वनरक्षकाला निलंबित करण्यात आले असून ...

Only 20 lakhs of trees are suspended | २० लाखांच्या वृक्षतोडीत केवळ वनरक्षक निलंबित

२० लाखांच्या वृक्षतोडीत केवळ वनरक्षक निलंबित

तीव्रता दडपली : आरएफओ-एसीएफच्या बचावासाठी धडपड
उमरखेड : कृष्णापूर वनवर्तुळातील सुमारे २० लाख रुपयांच्या सागवान तोडीत केवळ एका वनरक्षकाला निलंबित करण्यात आले असून उमरखेडचे वनपरिक्षेत्र अधिकारी गोदाजी चव्हाण आणि सहायक वनसंरक्षकांना वाचविण्यासाठी पुसद डीएफओ कार्यालयातून धडपड सुरू असल्याची माहिती आहे.
उमरखेड वनपरिक्षेत्रांतर्गत कृष्णापूर वनवर्तूळातील पिरंजी बीटमध्ये चार दिवसांपूर्वी सुमारे २० लाखांच्या सागवानाची तोड उघडकीस आली. वनअधिकारी व तस्करांच्या संगनमताने ही तोड झाल्याचा अंदाज आहे. ५०० पेक्षा अधिक परिपक्व झाडांची कत्तल केली गेली. शुक्रवारी पुसदचे उपवनसंरक्षक कमलाकर धामगे यांनी वृक्षतोड झालेल्या ठिकाणी भेट दिली. प्राथमिक चौकशीअंती पिरंजीचे वनरक्षक व्ही.सी. जाधव यांना निलंबित करण्यात आले आहे. या वृक्षतोडीला एसीएफ, आरएफओ, वनपाल ही प्रमुख मंडळी जबाबदार असताना केवळ वनरक्षकाचा बळी देऊन या अधिकाऱ्यांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप होत आहे. निलंबित वनरक्षकाला नुकतीच वनपाल पदावर बढती देण्यात आली होती. बढतीवर त्यांची वन्यजीव विभागाच्या बिटरगाव वनवर्तूळात (पांढरकवडा वन्यजीव विभाग) नेमणूक देण्यात आली. मात्र ते कार्यमुक्त झाले नाही.
२० लाखांच्या या अवैध वृक्षतोडीची तीव्रता दडपण्याचा प्रयत्न कारवाईच्या भीतीने केला जात आहे. कक्ष क्र.४६३ मध्ये केवळ तीन लाखांची तोड दाखविण्याची व्यूहरचना केली जात आहे. आजूबाजूच्या जंगलातून लाकूड जमा करून ५० हजारांचे लाकूड वाचविल्याचाही देखावा निर्माण केला जाणार आहे. मूळ वृक्षतोड झालेल्या कक्ष क्र.४६२ व ४६४ ची अद्याप चौकशी व निरीक्षण नोंदविले गेले नाही. वृक्षतोडीची व्याप्ती दिसू नये म्हणून चक्क बुंदे गायब करण्याचा प्रयत्नही केले जात आहे. विशेष असे, उमरखेडचे वनपरिक्षेत्र अधिकारी बदलीसाठी पात्र असताना त्यांना एक वर्षाची मुदतवाढ दिली गेल्याचे सांगितले. यावरून उमरखेड वनपरिक्षेत्रातील आरएफओ गोदाजी चव्हाण यांचा ‘इंटरेस्ट’ दिसून येतो. वनअधिकाऱ्यांच्या संगनमतानेच २५० पेक्षा अधिक परिपक्व झाडांची तोड करून हे सागवान तेलंगाणा व मराठवाड्यात तस्करांनी नेल्याचा संशय आहे. वानेरमाळ येथेही वृक्षतोड आढळून आली.
लगतच्या निंगनूर जंगलातही ही तोड झाली आहे. काही दिवसांपूर्वी बैलगाडी पकडून त्यातही ‘सेटींग’ केली गेली होती. कृष्णापूर जंगलात खास गणेश व लेल्या नामक मिस्त्रीची नियुक्ती करून कधी आरीने तर कधी हाताने सागवान तोड करण्यात आली. त्यात तेथील वनरक्षक अरविंद राठोड यांची भूमिका संशयास्पद असल्याचे सांगण्यात येते. २० लाखांच्या वृक्षतोडीसाठी तस्करांनी खास मजूर लावले होते. या तस्करीने वनखात्याच्या तपासणी नाक्यांची उपयोगिता शून्य असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले.
दरम्यान, वनरक्षक जाधव यांना निलंबित करण्यात आले आहे. अद्याप चौकशी सुरू आहे. दोन दिवसात सर्व काही निष्पन्न होईल. त्यात दोषी आढळलेल्या प्रत्येकावर कारवाई केली जाणार असल्याचे पुसदचे डीएफओ कमलाकर धामगे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
(शहर प्रतिनिधी)
सीसीएफ गुरमेंनी बाहेरील अधिकारी नेमावेत
उमरखेड वनपरिक्षेत्रातील २० लाखांची तोड रेकॉर्डवर आल्यास वनरक्षकापासून डीएफओपर्यंत सर्वांवरच निष्क्रियतेचा ठपका ठेऊन कारवाई होण्याची शक्यता आहे. म्हणून या वृक्षतोडीची तीव्रता दडपण्याचा जोरदार प्रयत्न सुरू आहे. या वृक्षतोडीचे वास्तव रेकॉर्डवर यावे यासाठी यवतमाळचे मुख्य वनसंरक्षक व्ही.व्ही. गुरमे यांनी पांढरकवडा किंवा अन्य विभागातील चांगल्या प्रतिमेच्या अधिकाऱ्याची या वृक्षतोडीच्या चौकशीसाठी नेमणूक करावी, असा वन्यप्रेमी व कृष्णापूर परिसरातील गावकऱ्यांचा सूर आहे. साधा वनरक्षक एवढ्या मोठ्या वृक्षतोडीला एनओसी देऊ शकत नाही. त्यात एसीएफ, आरएफओ, वनपाल हे सर्वच थेट सहभागी असावे. डीएफओंची निष्क्रियता त्यासाठी कारणीभूत ठरली आहे. म्हणूनच अन्य डीएफओंकडून गुरमेंनी चौकशी करावी, असा जोरदार सूर आहे. विशेष असे, स्वत: गुरमे ५ फेब्रुवारी २००६ ते १५ जुलै २००९ या काळात पुसदचे डीएफओ राहिले आहेत. त्यामुळे त्यांना पुसद विभागातील सागवान वृक्षांची उपयोगिता किती याची पूर्ण जाणीव आहे. म्हणूनच त्यांच्याकडून वास्तव चौकशीची अपेक्षा केली जात आहे. या वृक्षतोडीवर आताच नियंत्रण न आल्यास भविष्यात पुसद विभागातील जंगलाचा वाळवंट झाल्याचे पाहण्याची वेळ येऊ शकते. पुसद विभागात अप्प्या हा सागवान तस्कर सर्वपरिचित आहे. खंडाळा व परिसरात तो सागवान तोड करतो. मात्र अद्यापही त्याला अटक झाली नाही. वनअधिकारी त्याच्या वाटेला जाण्यास घाबरत असल्याचेही सांगितले जाते.

Web Title: Only 20 lakhs of trees are suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.