एकमार्गी रस्ता सोडला मोकाट
By Admin | Updated: December 4, 2015 02:39 IST2015-12-04T02:39:19+5:302015-12-04T02:39:19+5:30
वणी उपविभागासाठी वाहतूक पोलिसांची स्वतंत्र शाखा आहे. शहरात केवळ दोन रस्ते एकमार्गी ठरवून देण्यात आले.

एकमार्गी रस्ता सोडला मोकाट
वाहतुकीची कोंडी : वादावादीच्या घटनांना मिळतो वाव
वणी : वणी उपविभागासाठी वाहतूक पोलिसांची स्वतंत्र शाखा आहे. शहरात केवळ दोन रस्ते एकमार्गी ठरवून देण्यात आले. मात्र या दोन रस्त्यावरील एकेरी वाहतूक कायमस्वरूपी सुरू ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांकडे सवड नाही. हे दोन्ही रस्ते बराच वेळ पोलिसांविना मोकाटच असतात. पोलीस मात्र शहराबाहेर एखाद्या रस्त्यावर आडवे होऊन केवळ वसुलीच्या कामात गुंतलेले आढळून येतात. त्यामुळे स्वतंत्र वाहतूक शाखा स्थापन होऊनही वणीकरांचा लाभ काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
तालुक्यात वाहनांची संख्या भरमसाठ वाढली आहे. चार चाकी, दुचाकी वाहनांपासून अवजड वाहनांची रस्त्यावरून नेहमी मुंग्या-माकोड्याप्रमाणे रांग दिसते. मात्र रस्त्यांची रूंदी ५० वर्षांपूर्वीच्या वाहतूक व्यवस्थेवरून ठरविण्यात आल्याने, आता हे रस्ते सध्याच्या वाहतुकीस तोकडे पडत आहे. त्यामुळे किमान शहरातील वाहतूक व्यवस्था तरी सुधारली जावी, या हेतूने शहरात प्रवेश करणारे दोन मार्ग एकमार्गी केले जावे, अशी वणीकरांची मागणी होती.
या मागणीचा विचार करून येथील उपविभागीय अधिकाऱ्यांनी तीन वर्षांपूर्वी एक अध्यादेश काढून टिळक चौक-सर्वोदय चौक-गाडगेबाबा चौक हा मार्ग येण्यासाठी व टिळक चौक-खाती चौक-गांधी चौक-गाडगेबाबा चौक हा मार्ग जाण्यासाठी ठरवून दिला. या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी नगरपरिषद व पोलिसांवर सोपविण्यात आली. नगरपरिषदेने या दोन्ही रस्त्यावरील अतिक्रमणे हटवून रस्त्याच्या हद्दीवर पिवळे पट्टे मारून दिले. मार्गाच्या आरंभस्थळी सूचना फलक लावून दिले. रस्त्यावरील पार्किंगची सोय नगरपरिषद खुले रंगमंच व जुन्या दवाखान्यात करून दिली.
ज्यावेळी हा अध्यादेश निघाला, त्यावेळी येथे वाहतूक पोलिसांची स्वतंत्र शाखा नव्हती. दोन वर्षांपूर्वी सुयोगाने तिचीही स्थापना झाली. वाहतूक शाखेला एक स्वतंत्र पोलीस निरीक्षक, एक सहायक पोलीस उपनिरीक्षक व पुरेसे मनुष्यबळ व स्वतंत्र वाहन मिळाले. चौकात लावण्यासाठी पोलीस चौक्या मिळाल्या. तरीही वाहतूक पोलिसांकडून एकेरी वाहतुकीची काटेकोर अंमलबजावणी केली जात नाही. कधी-कधी वाहतूक पोलीस या रस्त्यावर दिसतात. तेसुद्धा चौकीत न थांबता रस्त्याच्या कडेला कोठेतरी दडी मारून बसतात व उलट्या मार्गाने वाहन येताच त्याला अडवून दंड वसूल केला जातो.
पोलिसांचे वाहतूक सुरळीत करण्यापेक्षा वसुलीकडेच जादा लक्ष असल्याचे दिसून येते. सकाळी ९ ते १० वाजतापर्यंत व सायंकाळी ६ वाजतानंतर या मार्गावरून पोलीस दिसेनासे होतात. कित्येक दिवस तर दिवसभरही एकेरी रस्ते मोकाटच दिसतात. त्यामुळे या मार्गावर जाणारी व येणारी वाहने धावत असल्याने वाहनांची गर्दी होऊन कोंडी होते. परिणामी वाहनधारकांमध्ये वादावादी होऊन शाब्दीक चकमकीही घडतात. अनेकांचा वेळ वाया गेल्याने त्यांना नियोजित ठिकाणी जाण्यास उशीरही होतो. अर्धा रस्ता पार्किंगने व्यापलेला असतो. याकडेही पोलिसांचे लक्ष जात नाही. गांधी चौकात रस्त्याच्या मधोमध हातगाड्यांची रांग लागलेली दिसते. सणासुदीच्या काळात हे चित्र बघायला मिळते. अस्ताव्यस्त पार्किंगमुळे व अरूंद रस्त्यामुळे वारंवार रस्ते जाम होण्याचे प्रकार घडतात. मात्र याकडे लक्ष द्यायला वाहतूक शाखेकडे सवड नाही, असेच दिसून येते. त्यामुळे उपविभागीय दंडाधिकाऱ्यांच्या अध्यादेशाची अवहेलना होत असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. पोलिसांनी सकाळी ७ ते सायंकाळी ९ वाजतापर्यंत तरी किमान एकेरी वाहतुकीची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)