कॅनॉलच्या खड्ड्यात ट्रॅक्टर कोसळून एक ठार, एक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2021 17:23 IST2021-11-24T17:20:13+5:302021-11-24T17:23:31+5:30
कोलगावाच्यासमोर असलेल्या नवरगाव मध्य प्रकल्पाच्या कालव्यावरून जात असताना चालकाचे नियंत्रण सुटले व ट्रॅक्टर थेट खोल खड्ड्यात कोसळला. यात चालक व एक मजूर दबले गेले.

कॅनॉलच्या खड्ड्यात ट्रॅक्टर कोसळून एक ठार, एक जखमी
यवतमाळ : कोलगाव-वेगाव या दोन गावांमध्ये असलेल्या कॅनॉलच्या पुलावरून मारेगावरून वेगावकडे जाणारा ट्रॅक्टर खोल खड्ड्यात कोसळला. यात एकाचा जागीच मृत्यू, तर एक गंभीर जखमी झाला. ही घटना मंगळवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली.
मारोती मुरलीधर वाडकोडावार ( वय २३) असे मृताचे नाव आहे, तर भारत बळीराम बोधाडकर ( वय २६) असे गंभीर जखमी ट्रॅक्टरचालकाचे नाव आहे. ते मंगळवारी रात्री शेतात रोटाव्हेटर मारून वेगावकडे जात होते. यादरम्यान कोलगावाच्यासमोर असलेल्या नवरगाव मध्य प्रकल्पाच्या कालव्यावरून जात असताना चालकाचे नियंत्रण सुटले. त्यानंतर ट्रॅक्टर थेट खोल खड्ड्यात कोसळला. यात चालक व एक मजूर दबले गेले.
रात्रीची वेळ असल्याने त्यांच्या मदतीला कोणीही धावून आले नाही. रात्री उशिरा या मार्गाने जाणाऱ्या व्यक्तीला अपघात दिसल्यावर वेगाव येथे जाऊन याची कल्पना गावकऱ्यांना दिली. गावकरी घटनास्थळी पोहोचून दबलेल्या ट्रॅक्टरचालक भारत बोधाडकर व मारोती वाडकोडावार यांना तत्काळ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच मारोतीचा मृत्यू झाला होता. तर चालक भारत बोधाडकर याला पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे हलवण्यात आले.