लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वसंतराव नाईक शासकीय महाविद्यालयात कार्यरत परिचारिकांनी राज्य परिचारिका संघटनेच्या निर्देशावरून कामबंद आंदोलन पुकारले आहे. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मागील तीन दिवसांपासून दररोज सकाळी परिचारिका रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर निदर्शने देत आहेत. २६ मेपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. वैद्यकीय शिक्षण व सार्वजनिक आरोग्य विभागातील परिचारिका संवर्गातील सर्वच स्तरातील पदोन्नती, पदनिर्मिती व पदभरती कायमस्वरूपी करावी, केंद्र शासनाप्रमाणे नर्सिंग भत्ता नव्याने मंजूर करावा, सर्व परिचारिकांना सरसकट सात हजार २०० रुपये प्रतिमाह भत्ता मंजूर केला जावा, गणवेश भत्ता हा अनेक वर्षांपासून वाढलेला नाही. आता वाढीव गणवेश भत्ता दिला जावा, परिचारिकांच्या पदनामात केंद्र शासनाप्रमाणे बदल करण्यात यावा, शैक्षणिक भत्ते देण्यात यावे. या आंदोलनात महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना मुख्यालय लातूर यांच्या निर्देशावरून शाखेच्या अध्यक्ष संगीता राठोड, सरचिटणीस सिद्धार्थ मेश्राम, कोषाध्यक्ष सुखदेव राठोड, कार्याध्यक्ष दीपाली मेश्राम, सहसचिव शकुंतला पांडे, सहकोषाध्यक्ष वैशाली दातार यांच्यासह परिचारिका आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.
शासनाने विनंती बदल्या मान्य कराव्या- कोविड महामारीच्या काळात कोणत्याही सुट्या न घेता परिचारिकांनी सातत्याने सेवा दिली. आता त्यांच्या ३०० पेक्षा अधिक रजा असल्यास रद्द केल्या जातात. अशा रजा साठवण्याची व पुन्हा उपभोगण्याची परवानगी द्यावी, अवैद्यकीय शिक्षण विभागातील परिचारिका संवर्गाच्या विनंती बदल्या गेल्या चार वर्षांत झालेल्या नाही. अनेक कर्मचारी कुटुंबापासून दूर राहून बाहेर जिल्ह्यात सेवा देत आहे. शासनाने त्यांच्या विनंती बदल्या मान्य कराव्या, अशी मागणी आहे.