कमरेला देण्याचे इंजेक्शन नर्सने दंडात टोचले; रुग्णाचा हात पडला लुळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 21:59 IST2021-09-13T21:59:08+5:302021-09-13T21:59:48+5:30
Yawatmal News हातपाय दुखत असल्याची तक्रार घेऊन गेलेल्या रुग्णाच्या कमरेला इंजेक्शन देण्याऐवजी त्याच्या दंडावर इंजेक्शन टोचल्याने त्याचा एक हातच लुळा पडला. गेल्या पाच महिन्यापासून ही व्यक्ती न्यायासाठी आरोग्य विभागाचे उंबरठे झिजवत आहे.

कमरेला देण्याचे इंजेक्शन नर्सने दंडात टोचले; रुग्णाचा हात पडला लुळा
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ: निरनिराळ्या कारणांनी सध्या चर्चेत असलेले वणी तालुक्यातील कायर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र पुन्हा एका गंभीर प्रकाराने प्रकाश झोतात आले आहे. हातपाय दुखत असल्याची तक्रार घेऊन गेलेल्या रुग्णाच्या कमरेला इंजेक्शन देण्याऐवजी त्याच्या दंडावर इंजेक्शन टोचल्याने त्याचा एक हातच लुळा पडला. गेल्या पाच महिन्यापासून ही व्यक्ती न्यायासाठी आरोग्य विभागाचे उंबरठे झिजवत आहे. मात्र अद्यापही त्याला न्याय मिळाला नाही. (The nurse injected the injection into the waist; The patient's hand fell off)
पंढरी आडकू पिंपळकर असे या व्यक्तीचे नाव असून, तो वणी तालुक्यातील पठारपूर येथील रहिवासी आहे. या प्रकरणात दोषीवर कारवाई न झाल्यास न्यायासाठी आपण कोर्टात जाऊ, असा इशाराही त्याने दिला आहे. पंढरी पिंपळकर याच्याकडे सात एकर शेती असून पत्नी, मुलगा, मुलगी असे त्याचे कुटुंब आहे. १ एप्रिल रोजी हातपाय दुखत असल्याची तक्रार घेऊन पंढरी पिंपळकर हा कायर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी गेला. त्यावेळी तेथे उपस्थित डॉ. लोणारे यांनी त्याची तपासणी केली. त्यानंतर डॉक्टरने पंढरीला बाहेरून इंजेक्शन विकत आणण्यास सांगितले. त्यानुसार पंढरीने ते आणले.
डॉक्टरांनी इंजेक्शन टोचून घेण्यासाठी पंढरीला परिचारिका शिल्पा फुलमाळी यांच्याकडे पाठविले. मात्र फुलमाळी यांनी इंजेक्शन कमरेत टोचण्याऐवजी हाताच्या दंडावर टोचले. काही वेळातच पंढरीच्या डाव्या हाताची हालचाल अचानक बंद झाली. ही बाब त्याने लगेच डॉक्टर व परिचारिकेला सांगितली. त्या वेळी परिचारिकने चूक झाल्याची कबुलीही दिली. त्यावर २० दिवसांनंतर आराम पडेल, असे डॉक्टरांनी सांगितले, असे पंढरीने तक्रारीत नमूद केले आहे. यावरून आता पाच महिन्यांचा कालावधी लोटला आहे. परंतु अद्यापही हाताची हालचाल बंद आहे. यासंदर्भात पंढरीने त्याच वेळी तालुका वैद्यकीय अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिका?्यांकडे तक्रार केली. मात्र या तक्रारीवर आतापर्यंत कोणतीही कार्यवाही झाली नाही.
पंढरीच्या डाव्या हाताचा पंजाच लुळा पडल्याने शेतीची कामे करणे कठीण झाले आहे. शेतीच्या उत्पन्नावरच पंढरीच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. आता शेतीच्या कामाचा भार लहान मुलावर पडला आहे. कुटुंबाचा कर्ताच अपंग झाल्याने या कुटुंबाची विवंचना वाढली आहे.
अनेक कारणांनी वादग्रस्त ठरलेले कायर प्राथमिक आरोग्य केंद्राला पिल्कीवाढोणा येथील नागरिकांसाठी २०० कोरोना लसींचा पुरवठा करण्यात आला होता. हे शिबिर ८ सप्टेंबरला घेण्यात येणार होते. मात्र या दिवशी येथे शिबिरच घेण्यात आले नाही. येथे सोमवारी झालेले हे पहिलेच शिबिर आहे. या शिबिरात २१७ जणांना कोरोना लस देण्यात आली. गावक?्यांनी अनेकदा मागणी करूनही आरोग्य विभागाने लसीकरणाकडे दुर्लक्ष केले होते. अखेर पठारपूर ग्रामपंचायतीचे सदस्य प्रशांत जुमनाके व विलास मांडवकर यांनी प्रशासनाकडे तक्रार केली होती.