उताऱ्यात घट : अपुरा पाऊस आणि किडींचा परिणामपुसद : अपुरा पाऊस आणि किडींच्या प्रादुर्भावाने यंदा सोयाबीनच्या उत्पादनात प्रचंड घट होत आहे. यावर्षी शेतकऱ्यांना सोयाबीन पोत्याने नव्हे तर किलोने विकण्याची वेळ आली आहे. निघत असलेल्या सोयाबीनमधून मजुरीही निघत नाही. पुसद तालुक्यात दोन धरणे असूनही माळपठार परिसर आवर्षणग्रस्तच आहे. डोंगर-दऱ्यात वसलेल्या तालुक्यात हलक्या प्रतिची जमीन आहे. त्यामुळे या जमीनीत तसेही उत्पन्न कमीच येते. असे असले तरी यंदा तर अनेक शेतकऱ्यांना सोयाबीनला मुकावे लागले आहे. अत्यल्प पावसाने शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभे ठाकले आहे. पेरणी केल्यानंतर पावसाने दीर्घ दडी मारली. पिके सुकायला लागली होती. उडीद, मुंग शेतकऱ्यांच्या हातचे गेले. पोळ््यापासून पावसाने हजेरी लावली. त्यानंतर आठ-दहा दिवस पाऊस पडला. खरीप पिकांना जीवदान मिळाले होते. नंतर मात्र पावसाने पाठ फिरविली तो आजतागायत. याकाळात सोयाबीनची वाढ खुंटली. पिकांवर किडींचा प्रादुर्भाव झाला. पाने पिवळी पडून सोयाबीन उद्ध्वस्त झाले. काही शेतकऱ्यांनी ओलीत करून पीक वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र आता उताऱ्यात घट येत आहे. पूर्वी एका बॅगला सात ते आठ क्विंटल सोयाबीन होत होते. परंतु यावर्षी एका बॅगला एक क्विंटलही उतारा येत नाही. मजुरी व थ्रेशरचालकाला दिले जाणारे पैसे यामुळे शेतकऱ्यांच्या हातात काहीही उरत नाही. अशा स्थितीत सोयाबीन काढावा की सरळ नांगर टाकावा अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. (तालुका प्रतिनिधी)
सोयाबीन पोत्याने नव्हे, किलोने विकण्याची वेळ
By admin | Updated: October 13, 2014 23:28 IST