निधीच नाही, सीसीटीव्ही लावणार तरी कसे? विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची खात्री कोण देणार ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2024 17:54 IST2024-09-20T17:53:21+5:302024-09-20T17:54:07+5:30
Yavatmal : शिक्षण विभागासमोर पेच; प्रायोगिक तत्त्वावर केवळ १७ आदर्श शाळांची निवड

No funds, how to install CCTV? Who will ensure the safety of the students?
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : बदलापूर येथील घटनेने शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला. यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी जिल्हा परिषद, नगरपालिका, अनुदानित व विनाअनुदानित शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. अशा शाळांमध्ये एक महिन्याच्या आत कॅमेरे लावण्याचे निर्देश देण्यात आले. मात्र, प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी एक महिन्याचा कालावधी संपत आला असताना आता जिल्हा परिषद व नगर पालिका शाळांसाठी निधीच नसल्याची बाब समोर आली आहे. आता निधीच्या उपलब्धेनुसार प्रायोगिक तत्त्वावर केवळ १७ आदर्श शाळांची सीसीटीव्ही कॅमेऱ्यासाठी निवड करण्यात आली.
जिल्ह्यात सर्व प्रकारच्या मिळून एकूण तीन हजार ३२७ शाळा आहेत. यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दोन हजार २२९, खासगी अनुदानित ६९१, विनाअनुदानित ४०६ शाळांची संख्या आहे. यापैकी सर्व माध्यमांच्या मिळून दोन हजार ५५३ शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याची वस्तुस्थिती आहे. जिल्हा परिषद व नगरपालिकेच्या दोन हजार २२९ शाळा यात पिछाडीवर आहेत. बदलापूर येथे चिमुकल्या मुलीवर अत्याचार झाल्याच्या घटनेने राज्य पेटून उठले आहे. दररोज कुठे ना कुठे अत्याचाराच्या घटना घडत असल्याने पालकांत व्यक्त होणारी चिंता व आंदोलनाची दखल घेत शालेय शिक्षण विभागाने सर्व माध्यमांच्या शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे निर्देश दिले. त्यासाठी अनुदानित व विनाअनुदानित शाळांना एक महिन्याचा 'अल्टिमेटम' देत शाळांची मान्यता रद्द करण्यात आल्याचा इशारा देण्यात आला.
त्यासाठी देण्याचा आलेला एक महिन्याचा कालावधी संपण्यासाठी आता अवघा आठवडाभराचा कालावधी बाकी आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांना जिल्हा नियोजन समितीकडून निधी मिळणार होता. त्यांच्याकडे निधी नसल्याची अडचण पुढे करण्यात आली. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमध्ये सीसीटीव्ही कसे बसवायचे, असा पेच शिक्षण विभागासमोर निर्माण झाला. यावर प्रायोगिक तत्त्वावर केवळ १७ शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्याचा निर्णय घेतला. इतर शाळांमध्ये कॅमेरे लागलेच नाही.
कोणत्या शाळांत किती कॅमेरे
तालुका स्थानिक अनुदानित विनाअनुदानित
आर्णी ५ २१ २१
बाभूळगाव २ १८ २
दारव्हा १ ५० २०
दिग्रस ० ४१ २६
घाटंजी 3 १९ २
कळब २ २५ ८
महागाव ० १९ ७
मारेगाव ० १५ ५
नेर १० ३१ १३
पांढरकवडा ८ ८ २५
पुसद २२ ४८ १३
राळेगाव २ १८ ७
उमरखेड १४ २९ १५
वणी २ १६ १५
यवतमाळ ६ ६७ ७१
झरी १२ १६ ३
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या केवळ ८९ शाळांत कॅमेरे
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दोन हजार २२९ शाळा आहे. यातील केवळ ८९ शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. खासगी अनुदानित शाळा ६९१ असून, ४४१ शाळांमध्ये कॅमेरे आहेत, तर विनाअनुदानित ४०६ शाळांपैकी २४९ शाळांमध्ये सीसीटीव्ही आहेत.