मेहतर समाजाला फुले-आंबेडकरांच्या विचारांची गरज
By Admin | Updated: December 4, 2015 02:42 IST2015-12-04T02:42:35+5:302015-12-04T02:42:35+5:30
इंग्रजांच्या सानिध्यात राहणारा, शहरातील सर्व सोयी-सवलतींचा लाभ घेणारा, एकेकाळी टाय-सुट-बुटात वावरणारा, ....

मेहतर समाजाला फुले-आंबेडकरांच्या विचारांची गरज
संजीव खुदशाह : स्मृतीपर्वात समाजाच्या ‘दशा आणि दिशे’वर मंथन, युवक-युवतींचाही सन्मान
यवतमाळ : इंग्रजांच्या सानिध्यात राहणारा, शहरातील सर्व सोयी-सवलतींचा लाभ घेणारा, एकेकाळी टाय-सुट-बुटात वावरणारा, उत्तम इंग्रजी बोलणारा मेहतर समाज शिक्षणाअभावी आणि फुले-आंबेडकर विचारांपासून दूर राहिल्यानेच दिशाहीन झाला आहे, असे प्रतिपादन पत्रकार, लेखक, सफाई कामगार समुदायाचे अध्यक्ष संजीव खुदशाह यांनी केले.
स्मृतीपर्वात बुधवारी ३ डिसेंबर रोजी संत कबीर विचारपीठाहून ते बोलत होते. ‘मेहतर समाज दशा आणि दिशा’ या विषयावर त्यांनी आपले विचार मांडले. अध्यक्षस्थानी उत्कृष्ट महिला पुरस्कारप्राप्त, मानवमुक्ती संग्राम पुणेच्या संस्थापिका निशाताई पारचे होत्या.
ते पुढे म्हणाले, एकेकाळी गावकुसाबाहेरचे उपेक्षित जीवन जगणारा, अन्न, वस्त्र आणि निवारा नसणारा बाबासाहेबांचा समाज केवळ आणि केवळ शिक्षणाच्या भरोशावर आज विकसित झाल्याचे दिसते. शिक्षणाचे महत्त्व महात्मा फुलेंनी जाणले. आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून बहुजनांना संधी उपलब्ध करून दिली, असे असूनही मेहतर समाज पुरोगामी विचारांपासून वेगळा राहण्याचे षड्यंत्र येथील प्रतिगामी लोकांनी केले. आमची केवळ स्तुती केली. त्यामागेही त्यांचा स्वार्थ होता. आम्ही करीत असलेली निकृष्ट कामे त्यांना करावी लागू नयेत हा त्या मागचा हेतू होता. इंग्रजांच्या वेळचे जुलमी कायदे रद्द करण्याचे श्रेयही डॉ. आंबेडकरांनाच जाते, असे ते म्हणाले. मेहतर समाजाच्या विकासासाठी या महामानवांचे विचार अंमलात आणण्याची गरज यावेळी त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा निशाताई पारचे यांनी स्त्रियांची कुचंबना व्यक्त केली. अजूनही मेहतर समाजात स्त्रियांचे स्थान दुय्यम असून झाडू, घुंंघट यातच ही स्त्री अडकून पडली आहे. पती निधनानंतरच्या कुप्रथा नष्ट करण्याची गरज आहे. घुंघट घेण्याचीसुद्धा आज गरज नाही, असे त्यांनी सांगितले. राष्ट्रनिर्मितीसाठी स्त्रिया अत्यंत महत्त्वाच्या असून त्या शिक्षणाने स्वाभिमानी, स्वावलंबी होण्याची आवश्यकता त्यांनी प्रतिपादन केली. प्रमुख वक्त्याच्या भाषणापूर्वी हरिश जानोरकर नागपूर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. बौद्ध धम्माने मेहतर समाजाला सन्मानाने वागविले. सुमित भंगी भिक्कू बनले. त्या बौद्ध धम्माचा आपण आदर केला पाहिजे. तसेच आजच्या काळात रोटी-बेटी व्यवहार झाले तर समाज जोडण्यासाठी फार उपयुक्त ठरणार आहे, असेही ते म्हणाले. यावेळी पुरुषोत्तम गायकवाड, दिनेश चिंडाले, सविता चव्हाण यांचेही मनोगत झाले. कार्यक्रमाच्या विचारपीठावर रमेश तांबे, नयन मलिक, मयूर सिंघानिया इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोनिका मयूर सिंघानिया हिने केले. प्रास्ताविक विनायक व्यास याने केले तर राजेंद्र चव्हाण यांनी आभार मानले. समाजातील युवक-युवतींचा विशेष योगदानाबद्दल यावेळी सन्मान करण्यात आला. (सांस्कृतिक प्रतिनिधी)