आई हरविली अन् मुले सापडली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2020 06:00 AM2020-01-25T06:00:00+5:302020-01-25T06:00:10+5:30

यापूर्वीही ती यवतमाळात एकटी आली होती. बसस्थानकावर उतरून आॅटोरिक्षा पकडून थेट मंगेशच्या घरी जाणे हा तिचा शिरस्ता होता. मात्र यावेळी यवतमाळचे बसस्थानकच नव्या जागेत बदलले आहे. त्यामुळे अनुसयाबाई संभ्रमित झाल्या. कुठे जावे हे त्यांना कळेना. वाघापूरकडे जाण्याऐवजी ती वडगावकडे निघून गेली. मग तर पंचायईतच झाली. काही केल्या घर सापडेना. शेवटी शनिवारपासून गुरुवारपर्यंत ती भटकत राहिली.

Mother Lost and Children Found! | आई हरविली अन् मुले सापडली!

आई हरविली अन् मुले सापडली!

Next
ठळक मुद्देबदललेल्या बसस्थानकाने चुकला रस्ता : पाच दिवस पोराचे घर शोधत फिरत राहिली

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : थकत्या वयात मुलाला भेटण्यासाठी वृद्ध आई आर्वीतून निघाली.. यवतमाळात पोहोचली. पण यवतमाळात आली अन् बसस्थानकाची जागाच बदललेली दिसली. भांबावलेली ही आई वाट चुकली. पोराचे घर काही केल्या सापडेना. एक दोन नव्हे तब्बल पाच दिवस ती नुसतीच फिरत राहिली.. अखेर गुरुवारी रात्री या आईला काही तरुणांनी गाठले. तीच तिची मुले बनली अन् त्यांनी तिला तिच्या खऱ्या मुलापर्यंत सहीसलामत नेऊन पोहोचविले...
अनुसयाबाई गजानन भोयर असे या आईचे नाव आहे. वर्धा जिल्ह्यातील आर्वी हे तिचे गाव. दोन मुलांसह ती आर्वीच्या आंबेडकर वॉर्डात राहते. मात्र तिचा तिसरा मुलगा मंगेश हा रोजगारासाठी यवतमाळच्या वाघापूर परिसरात राहतो. मंगेशला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. या नातवांच्या ओढीने अनुसयाबाई शनिवारी १८ जानेवारीला आर्वीतून एसटीत बसून यवतमाळकडे निघाली. यापूर्वीही ती यवतमाळात एकटी आली होती. बसस्थानकावर उतरून आॅटोरिक्षा पकडून थेट मंगेशच्या घरी जाणे हा तिचा शिरस्ता होता. मात्र यावेळी यवतमाळचे बसस्थानकच नव्या जागेत बदलले आहे. त्यामुळे अनुसयाबाई संभ्रमित झाल्या. कुठे जावे हे त्यांना कळेना. वाघापूरकडे जाण्याऐवजी ती वडगावकडे निघून गेली. मग तर पंचायईतच झाली. काही केल्या घर सापडेना. शेवटी शनिवारपासून गुरुवारपर्यंत ती भटकत राहिली.
शनिवारी निघालेली आई अजूनही मंगेशच्या घरी कशी पोहोचली नाही, म्हणून आर्वीतील संजय आणि सुरेश ही मुले हैराण झाली. तिघांनीही शोध सुरू केला. मंगेशने पुलगाव गाठले. वेगवेगळ्या बसस्थानकावर आईचा फोटो चिकटून स्वत:चा नंबरही लिहिला. पण पत्ता लागेना.
गुरुवारी रात्री ७ वाजताच्या सुमारास ही वृद्ध आई वडगाव परिसरातील बजरंग चौकात रस्त्याच्या कडेला थकून बसलेली होती. त्याचवेळी प्रा. जयंत चावरे यांना तिच्याकडे पाहून शंका आली. त्यांनी विचारपूस केल्यावर अनुसयाबाईची संपूर्ण हकीगत पुढे आली. चावरे यांच्या माहितीवरून संकल्प फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रलय टिप्रमवार आपल्या सहकाऱ्यांसह तेथे पोहोचले. अन् शोध सुरू झाला मंगेशच्या घराचा.
टिप्रमवार यांनी आपले पुलगाव येथील शिक्षक भाऊ सागर टिप्रमवार यांना फोन करून अनुसयाबाईच्या आर्वी येथील घराचा पत्ता सांगितला. सागर यांनी तो पत्ता आर्वी येथील आपले शिक्षक मित्र वाढवे यांना सांगितला. त्यावरून वाढवे यांनी अनुसयाबाईचा मुलगा सुरेश याला शोधले. त्याच्याकडून यवतमाळातील अनुसयाबाईचा मुलगा मंगेश यांचा फोननंबर मिळविला. अन् फोन येताच मंगेश अक्षरश: धावतच वडगावात आईजवळ पोहोचला. आई दिसताच त्याच्या डोळ्यातून अक्षरश: अश्रूच्या धारा लागल्या...

आई घरी पोहोचली नाही, तेव्हा आमच्या पायाखालची जमीनच सरकली होती. पण आपल्या यवतमाळच्या लोकांनी माझ्या आईची आपल्या आईसारखी काळजी घेतली. आई आता सुखरूप आहे. माझ्याजवळच आहे.
- मंगेश भोयर, यवतमाळ

Web Title: Mother Lost and Children Found!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.