मुलींसाठी महिनाभर धगधगणार ‘क्रांतीज्योती’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 06:00 IST2020-01-03T06:00:00+5:302020-01-03T06:00:12+5:30
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था आणि जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्यावतीने हे अभियान ३ ते २६ जानेवारीपर्यंत राबविले जाणार आहे. यात विविध स्पर्धांसह प्रत्यक्ष कृती युक्त कार्यक्रम राबविला जाणार आहे. शिक्षण विभागाची यंत्रणा प्रत्यक्ष गोरगरिबांच्या वस्त्यांमध्ये जाऊन शाळेपासून दूर असलेल्या मुलींचा शोध घेणार आहे. शाळाबाह्य मुलींची यादी तयार करून ती जाहीरही केली जाणार आहे.

मुलींसाठी महिनाभर धगधगणार ‘क्रांतीज्योती’
अविनाश साबापुरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : मुलींनी शाळेत जाणे पाप आहे, असा अपसमज बाळगणाऱ्या भारतीय समाजाला स्त्री शिक्षणाचा महामार्ग दाखविणाºया क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती शुक्रवारी बालिका दिन, महिला मुक्ती दिन म्हणून सर्वत्र साजरी होत आहे. जिल्ह्याच्या शिक्षण विभागाने मात्र यानिमित्त चक्क महिनाभर स्त्री शिक्षणाची मशाल अधिक प्रज्वलित करण्यासाठी विशेष मोहीम आखली आहे. ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले लेक वाचवा लेक शिकवा’ अभियान राबविले जाणार आहे.
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था आणि जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्यावतीने हे अभियान ३ ते २६ जानेवारीपर्यंत राबविले जाणार आहे. यात विविध स्पर्धांसह प्रत्यक्ष कृती युक्त कार्यक्रम राबविला जाणार आहे. शिक्षण विभागाची यंत्रणा प्रत्यक्ष गोरगरिबांच्या वस्त्यांमध्ये जाऊन शाळेपासून दूर असलेल्या मुलींचा शोध घेणार आहे. शाळाबाह्य मुलींची यादी तयार करून ती जाहीरही केली जाणार आहे. शाळाबाह्य मुलींना नजीकच्या शाळेत प्रवेश दिला जाणार आहे. मित्र गटाची स्थापना करून त्यात सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश केला जाणार आहे.
राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती
या अभियानासाठी शिक्षण विभागाने ३ ते २६ जानेवारीपर्यंतचा दिवसनिहाय कार्यक्रम तयार केला आहे. त्यात १२ जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ जयंती आणि स्वामी विवेकानंद जयंतीचाही समावेश आहे. यानिमित्त गावातील कर्तृत्ववान व्यक्तींची विद्यार्थ्यांना ओळख करून दिली जाणार आहे.
मुलींचा आहार, समुपदेशन आणि मैदानी खेळ
या अभियानात मुलींच्या शिक्षणासोबतच त्यांना संतुलित व सकस आहार कसा देता येईल याबाबत मार्गदर्शन होणार आहे. त्यासाठी वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, आशा स्वयंसेविका यांची मदत घेतली जाणार आहे. गावातील संघर्षातून यशस्वी झालेल्या महिलांची मुलाखत, सत्कार होणार आहे. प्रतिकुल परिस्थितीतून मुलींना उच्च शिक्षण देणाºया माता-पित्यांना पुरस्कार दिला जाणार आहे. ‘गुड टच बॅड टच’ याबाबत मार्गदर्शन होणार आहे. त्यासोबतच मुलींसाठी लांब उडी, उंच उडी, धावणे अशा मैदानी स्पर्धा घेतल्या जाणार आहे.