मान्सून सेलची ग्राहकांवर भुरळ
By Admin | Updated: September 13, 2015 02:17 IST2015-09-13T02:17:56+5:302015-09-13T02:17:56+5:30
सध्या शहरातील अनेक दुकानांसमोर स्पेशल मान्सून आॅफरचे फलक लागले आहे. आॅफ सिजनमुळे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी व्यावसायिकांनी कापड खरेदीवर ...

मान्सून सेलची ग्राहकांवर भुरळ
पुसदचा बाजार : मोठ्या प्रतिष्ठानांपेक्षा इतर ठिकाणीच गर्दी
पुसद : सध्या शहरातील अनेक दुकानांसमोर स्पेशल मान्सून आॅफरचे फलक लागले आहे. आॅफ सिजनमुळे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी व्यावसायिकांनी कापड खरेदीवर १० ते ५० टक्क्यांपर्यंत सवलतीची घोषणा केली आहे. ज्यावेळी खरेदीचा मौसम नसतो तेव्हा ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी व्यावसायिकांकडून हा फंडा वापरला जातो. विशेष म्हणजे ग्राहकांना आपल्या प्रतिष्ठानाकडे खेचण्यासाठी मोठ्या शोरूमसह स्थानिक व्यापारीही या मान्सून धूममध्ये उतरले आहे.
पुसद येथील कापड बाजाराची एक वेगळी क्रेझ आहे. अनेकांच्या पिढ्यान्पिढ्याचा व्यवसाय असला तरी नवीन व्यावसायिकांची संख्या वाढते आहे. केवळ कापड लाईनच नव्हेतर शहरातील विविध भागांमध्ये कापडांची दुकाने सुरू झाली आहे. त्यात ब्रॅन्डेड कपड्यांच्या शोरूमचाही समावेश आहे. सेलमध्ये खरेदीवर १० ते १५ टक्के सूट देण्यात येत आहे. ईलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवरही घसघशीत सवलत काही व्यावसायिकांनी दिली आहे. महागड्या वस्तू खरेदी करणे आवाक्याबाहेर असलेल्यांसाठी मान्सून सेल सुवर्ण संधी ठरत आहे. शहरातील व्यावसायिकांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दुकानांच्या दर्शनी भागासमोर फलक लावले आहेत.
काही ग्राहक दसरा-दिवाळी तसेच प्रसंगानिमित्तची खरेदी या दिवसातच करतात. आॅफ सिजनमध्ये दर्जेदार कापड मिळत नसल्याचे मत काही ग्राहकांचे आहे. परंतु या काळातही थेट कंपन्यांकडूनच विविध योजना जाहीर केल्या जातात. दर्जाबाबत कोणतीही तडजोड केली जात नाही. येणाऱ्या काळातील सण-उत्सवांसाठी कापडांची खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी होत आहे. सेलमुळे बाजारात बऱ्यापैकी आर्थिक उलाढाल होत आहे. त्याचा फायदा व्यावसायिकांसह गरजूंनाही होत आहे. (तालुका प्रतिनिधी)