मोबाईल मटका पुन्हा चिठ्ठीवर
By Admin | Updated: December 27, 2014 02:42 IST2014-12-27T02:42:12+5:302014-12-27T02:42:12+5:30
वणी तालुक्यातील पोलीस अधिकाऱ्यांची अवैध धंद्यावरील पकड सैल झाल्याने तालुक्यात अवैध धंद्यांना उधाण आल्याचा प्रत्यय येत आहे़ ...

मोबाईल मटका पुन्हा चिठ्ठीवर
वणी : वणी तालुक्यातील पोलीस अधिकाऱ्यांची अवैध धंद्यावरील पकड सैल झाल्याने तालुक्यात अवैध धंद्यांना उधाण आल्याचा प्रत्यय येत आहे़ यामुळे धंदे चालविणारे आलबेल असून जनतेला मात्र नाहक त्रास सहन करावा लागत आहे़
वणी तालुका औद्योगीकदृष्ट्या आघाडीवर असल्याने येथील सांपत्नीक स्थिती नेत्रदीपक आहे़ कोळसा व्यवसायामुळे येथे असंख्य परप्रांतीय लोकांनी पोटासाठी आसरा घेतला आहे़ तालुक्यात वाहनांची संख्याही भरमसाठ वाढली आहे़ तालुक्यातील गावांची कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी वणी, शिरपूर व मुकुटबन पोलीस ठाण्यांवर आहे़ हे तिनही पोलीस ठाणे वरकमाईसाठी अग्रणी स्थानावर असल्याचा समज आहे़ त्यामुळे येथे ठाणेदार पदाची खूर्ची मिळविण्यासाठी अधिकाऱ्यामध्ये स्पर्धा होत असल्याचे अनेकदा दिसून आले़ तालुक्यात अवैध धंद्यांना चाल द्यायची की नाही हे अखेर जिल्हा पोलीस अधीक्षक व स्थानिक आमदाराच्या मर्जीतली बाब असते़ यापूर्वीच्या काळात अवैध धंद्यांना बराच लगाम लागला होता़ मात्र या वर्षात वणी तालुक्यात अवैध धंद्यांनी डोके वर काढे आहे़ शहरात ठिकठिकाणी व खेड्यात मटक्याच्या पट्टी उघडपणे फाडल्या जात आहे़ शहरातील मटका पट्टी फाडण्याची ठिकाणे पोलिसांना माहीत नाही, असे म्हणता येणार नाही़ काही ठिकाणी सट्टासुध्दा चालविला जात आहे़ एवढेच नाही तर आता अवैध धंदे चालविणाऱ्यांमध्येच स्पर्धा निर्माण झाल्याने त्यांच्यातच भांडणे होत असल्याचे दिसून येत आहे़ तालुक्यात अवैध दारू विक्रीलाही पूर आला आहे़ गावोगावी अवैध दारू विक्री होत असल्याने जणू कायदा व सुव्यवस्था धोक्यात येत आहे़ एवढ्यात भंगार चोरी, दुचाकीची चोरी व घरफोडीच्या घटनाही वाढ होत आहे़ या लहान-सहान चोऱ्यांच्या घटनांची तक्रारही नागरिक करायला धजावत नाही़ त्यामुळे पोलीस दप्तरी यांची नोंदही होत नाही़ आता तर कोळशाची वाट तस्करीही होताना दिसत आहे़ कोळसा खाणीतून कोळसा भरून येणारे ट्रकमधून रस्त्यात थांबवून कोळसा उतरविला जातो़ हा कोळसा दिवसभर साठवून ठेवला जातो़ या ढिगाऱ्याजवळ मॅक्स वाहन पोहोचते़ त्यामध्ये तो कोळसा भरून कोल डेपोकडे नेला जातो़ दोन वर्षांपूर्वी वाट कोळसा तस्करीला उधाण आले होते़ मात्र यामुळे कोल माफियामध्ये गुप्त युध्द सुरू झाल्याने ही कोळसा तस्करी तात्काळ बंद करण्यात आली होती़ आता पुन्हा या कोळसा तस्करीने डोके वर काढल्याचे दिसत आहे़
तसेच तालुक्यात काही ठिकाणी कोंबड बाजारसुद्धा सुरू असण्याची शंका आहे. आठवड्यातील काही ठरावीक दिवशी शौकीन लोक दुचाकींवर भांडवावयाचे कोंबडे घेऊन जाताना दिसत आहे. पोलिसांनी यापूर्वी केसुर्ली शिवारातील कोंबड बाजारावर धाड टाकली होती.
अवैध व्यवसायात अवैध वाहनांचाही मोठा सहभाग आहे़ तालुक्यात रस्तोतरस्ती अवैध वाहतूक मुंग्या-माकोड्याप्रमाणे धावत आहे़ याकडे पोलीस व परीवहन विभागाचे हेतूपुर्वक दुर्लक्ष होत आहे़ शहरात अवैध वाहतूक करणारे आॅटो रस्त्याने आडवे-तिडवे धावत असल्याने पादचाऱ्यांना व दुचाकी चालकांना केव्हा अपघात होईल, याची शास्वतीच राहिली नाही़ या अवैध वाहनांचे आवाज तर जनतेच्या कानठीण्या बसवून टाकत आहे़ परंतु ही अवैध वाहतूक पोलिसांना सोन्याची अंडी देणारी कोंबडी ठरल्याने तिला आवर घालण्यासाठी पोलीस किंवा आरटीओ पुढाकार घेताना दिसत नाही़ नवनिर्वाचीत आमदारांनी तालुक्यात अवैध धंदे सुरू ठेवण्यात येऊ नये, असा इशारा पोलिसांना दिल्याचे सांगितले जात आहे़ मात्र त्यांचा इशाराही पोलीस का मानत नाही, हे समजायला आता मार्गसुद्धा उरला नाही़ (स्थानिक प्रतिनिधी)